वडूजला कोरोनापेक्षा ‘मनस्तापा’चा उद्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:32+5:302021-04-10T04:38:32+5:30
वडूज : पारदर्शक कारभाराचा गवगवा करणाऱ्या खटाव तालुक्यातील इतिहासात पहिली नगरपंचायत म्हणून अस्तित्वात आलेल्या वडूज नगरपंचायतीच्या ढिसाळ ...
वडूज : पारदर्शक कारभाराचा गवगवा करणाऱ्या खटाव तालुक्यातील इतिहासात पहिली नगरपंचायत म्हणून अस्तित्वात आलेल्या वडूज नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक उपाय लसीऐवजी मनस्ताप सहन करण्याची 'लस' घ्यावी लागली; तर वडूजला कोरोनापेक्षा नागरिकांच्या ‘मनस्तापाचा’ उद्रेक झाल्याने हुतात्मा स्मारकात एकच गडबड उडाली.
या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी वडूज येथील लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते परेश जाधव यांच्याकडे केली.
याबाबत वडूज येथील लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले की, वडूज नगरपंचायत व ग्रामीण रुग्णालयात 'लस' उपलब्ध करून ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिले लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वडूज येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी लसीकरण करण्याची घोषणा केली. तसेच त्याच दिवशी कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर स्पीकर लावून लसीकरणाची वडूज येथील नागरिकांना आठवण करून दिली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. परंतु दहा वाजले तरी वडूज नगरपंचायतीचे कोणीही सक्षम अधिकारी किंवा कर्मचारी हुतात्मा स्मारकाकडे साधे फिरकलेही नाहीत. ज्येष्ठ नागरिक मिळेल त्या वाहनाने लसीकरण करण्यासाठी आले होते. त्याची पदरी घोर निराशाच पडली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते परेश जाधव यांनी संतप्त नागरिकांची भेट घेतली. लस पुरवठा संपल्याने आज लसीकरण स्मारक ठिकाणी होणार नाही. असे सांगितले, तसेच जिल्हाधिकारी, दहिवडी प्रांताधिकारी वडूज नगरपंचायत मुख्याधिकारी यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर झालेल्या कारभाराबाबत ज्येष्ठ नागरिकांनी वडूज नगरपंचायतीच्या कारभाराबाबत निषेध नोंदवला. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढताच त्याची त्वरित अंमलबजावणी केली जाते. मग, नागरिकांना लस देणेबाबत एवढा ढिसाळ कारभार होत असेल तर कोरोना संसर्ग कसा रोखणार? असा सवाल नगरपंचायत विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
हुतात्मा स्मारक येथे लसीकरण करण्यासाठी आलेल्या सुमारे दीडशे ज्येष्ठ नागरिकांना लस न मिळताच मनस्ताप सहन करावा लागला आहे. तसेच त्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे वडूज नगरपंचायतीच्या संबंधित अधिकारी वर्गाने सहानुभूती म्हणून तरी अधिकृत माफी मागावी, अशी मागणी होऊ लागली आहे. जर लस उपलब्ध नसेल तर लसीकरणाबाबतचे वडूज नगरीतील जाहिरात फलक त्वरित हटवावेत व ज्यावेळी लस उपलब्ध होईल, त्यावेळेसच फलक लावावेत व घोषणा करावी, अशी ही मागणी होऊ लागली आहे.
कोट..
वडूज शहरातील सुमारे पाचशे लोकांचे लसीकरणासाठी नोंदणी झालेली आहे. त्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाकडे मागणीही केलेली होती. रात्री उशिरापर्यंत सातारा येथे लस घेण्यासाठी नगरपंचायत व तालुका आरोग्य विभागाची वाहने थांबलेली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे लस उपलब्ध होऊ शकली नाही. लवकरच लस उपलब्ध झाल्यानंतर तातडीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल.
-माधव खांडेकर, मुख्याधिकारी, वडूज नगरपंचायत
०९वडूज
फोटो: वडूज येथील हुतात्मा स्मारकात लसीकरणासाठी आलेल्या लोकांचा भ्रमनिरास झाल्याने गोंधळ उडाला. ( शेखर जाधव ) ----------------------------------