कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:20+5:302021-01-18T04:35:20+5:30
खटाव : बदलत्या हवामानामुळे कांदा रोपांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. खटाव ...
खटाव : बदलत्या हवामानामुळे कांदा रोपांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खटाव तालुक्यात मध्यंतरी सतत पडलेले ढगाळ वातावरण तसेच सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे उन्हाळी कांदा रोपांवर करपा, टाका, व्होपा आदी रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपे पिवळी पडून वाळत चालली आहेत. पिके वाचविण्यासाठी सध्या शेतकरी बाजारात उपलब्ध विविध महागड्या औषधांची फवारणी करत आहेत.
गेल्यावर्षी बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे पुरेशा प्रमाणात कांदा बियाणांचे उत्पादन झाले नव्हते. त्यामुळे कांदा बियाणांची टंचाई सुरुवातीला जाणवू लागली होती. त्यामुळे कांद्याच्या बियाणांचे दर गगनाला भिडले होते, अशाही परिस्थितीत मिळेल तेथून बी खरेदी करून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक सकाळी पडणारे धुके व धुक्यामुळे पडणारे दव यामुळे कांद्याच्या रोपांचे शेंडे पिवळे पडून रोपे करपा रोगाला बळी पडली आहेत. आधीच रोपाची कमतरता, त्यामुळे रोपाअभावी कांदा लागवडीची अनिश्चितता, त्यातच कांदा लागणीसाठी झालेला भांडवली खर्च वाया जाणार याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. कांदा उत्पादक शेतकरी सध्या बदलत्या हवामानामुळे चिंतित आहे. पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार याची धास्ती शेतकऱ्याला सतावत आहे.
चौकट..
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका...
सध्या कांद्याला बाजारात बऱ्यापैकी भाव सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कांद्यावर करपा रोगाचे आगमन शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके वाचविण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा व महागडे कीटकनाशके तसेच बुरशीनाशकाची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे.
(कोट)
कांदा पीक परतीच्या पावसामुळे आर्थिक फटका देऊन गेला. त्यामुळे कांद्याचा सध्याचा भाव पाहता यातून थोडीफार आर्थिक हालचाल होईल, अशी आशा होती; परंतु ऐनवेळी करपा रोगामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. कृषी विभागाच्या वतीने भेटी देऊन शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवाव्यात.
-विलास जगदाळे, कांदा उत्पादक शेतकरी, खटाव
17खटाव
कॅप्शन : खटाव तालुक्यात हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या करपा रोगामुळे कांद्याची रोपे पिवळी पडली आहेत.