उसावर हुमणीसह लोकरी मावाचा प्रादुर्भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:05+5:302021-07-04T04:26:05+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्याच्या पूर्व भागात उसावर हुमणीसह लोकरी मावा व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने, शेकडो एकरावरील ऊस पाणी ...
वरकुटे-मलवडी : माण तालुक्याच्या पूर्व भागात उसावर हुमणीसह लोकरी मावा व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने, शेकडो एकरावरील ऊस पाणी असूनही वाळून चालला आहे. हुमणी रोग नियंत्रित करण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करून विविध कीटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र, त्याचा फार काही उपयोग होत नसल्याने ही कीड शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.
पानी फाउंडेशनच्या कामामुळे ओढ्यावरील साखळी बंधारे, शेततलाव, पाझर तलावात पाणीसाठा टिकून आहे. त्यातच माणपूर्व भागातील शिवारात टेंभू,उरमोडी-तारळी योजनेचे पाणी आल्यापासून माण तालुक्याच्या बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी वरकुटे-मलवडी, कुरणेवाडी, शेनवडी या पूर्वेकडील भागात ऊसक्षेत्रात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्यात सध्या विक्रमी उत्पादन घेण्याची चढाओढ बघायला मिळत आहे. परंतु भरघोस आलेल्या उसावर सध्या हुमनी, लोकरी मावा व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने, शेतकरी धास्तावला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील ऊस हुमणी किडीने फस्त करीत आणला आहे. प्रयत्न करूनही कीड आटोक्यात येत नाही. त्यामुळे शेतकरी एकरी हजारो रुपये खर्चून कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत.
जांभुळणी, काळचौंडी, विरळी, वळई पानवन, गंगोती, शिरताव, पळसावडे, देवापूर, राजेवाडी यासह अन्य गावांतील उसाचे क्षेत्र हुमणी, लोकरी मावा व करप्याने बाधित झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. बँका, पतसंस्था, सोसायटीसह खासगी सावकाराची उचललेली कर्जे फेडायची कशी? या चिंतेत शेतकरी आहे. उसावरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारखानदार व कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गांतून होत आहे.
(कोट )
दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतकरी शेती पिकूनसुद्धा कंगाल झाला आहे. यंदा ऊस पीक जोमाने डोलू लागले होते; परंतु नजर लागल्यासारखं झालंय. हुमणीनं उसाचं पार मातेर करून टाकलंय. औषधांच्या फवारण्या चालूच हायत्या. काय कमी आलं तर बरं हुईल. न्हाय तर ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे.
-भारत अनुसे, ऊस उत्पादक, शेतकरी, बनगरवाडी