वाळवा तालुक्यात खिचडी राजकारणाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2015 10:02 PM2015-06-17T22:02:03+5:302015-06-17T22:02:03+5:30
पॅनेलप्रमुखांच्यावर वैयक्तिक टीका
अशोक पाटील =- इस्लामपूर -वाळवा तालुक्यातील १४ गावांत कृष्णा सह. साखर कारखान्याचे ५00 पेक्षा जास्त सभासद आहेत. यापैकी ६ गावात तिन्ही पॅनेलप्रमुखांनी उमेदवार दिला आहे. त्यामुळे ही गावे संवेदनशील बनली आहेत. उर्वरित सर्व कृष्णा खोऱ्यातील गावात पॅनेलप्रमुखांच्या चारित्र्यापासून त्यांच्या राजकीय वाटचालीच्या सर्व कुंडल्या मांडल्या जात आहेत. या निवडणुकीत जवळजवळ राष्ट्रवादीचेच उमेदरवार एकमेकांविरोधात उभे असल्याने वाळवा तालुक्यात राजकीय खिचडी झाली आहे.
वाळवा तालुक्यातील तांबवे येथे १३३०, नेर्ले १५५१, बोरगाव ८०८, इस्लामपूर ७१९, रेठरेहरणाक्ष ११६४, येडेमच्छिंद्र ९४२ अशी सभासदांची संख्या आहे. ही गावे पॅनेलप्रमुखांनी टार्गेट केली आहेत. या गावात तिन्ही पॅनेलकडून उमेदवार देण्यात आले आहेत. बोरगाव येथील जितेंद्र पाटील वगळता हे सर्व उमेदवार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. कृष्णाच्या निवडणुकीत हे कार्यकर्ते एकमेकांविरोधात ठाकले आहेत. याव्यतिरिक्त नरसिंहपूर ५४४, पेठ ७९०, कामेरी ७२४, कासेगाव ७००, भवानीनगर ५७३, शिरटे ६३३ अशी सभासदांची संख्या आहे. परंतु या गावात उमेदवारी देण्यात आलेली नाही. तरीसुध्दा या गावातून प्रचाराला वेग आला आहे.
संस्थापक पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते, रयत पॅनेलचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते आणि सहकार पॅनेलचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या राजकीय कारकीर्दीचे आणि वैयक्तिक पातळीवरील मोजमाप सर्वच सभासदांतून केले जात आहे. अविनाश मोहिते वगळता या इतरांनी कृष्णावर १५ ते २0 वर्षे सत्ता भोगली आहे. त्यांनी या काळात सभासदांना नेमके काय दिले यावरही मंथन सुरू आहे, तर अविनाश मोहिते यांनी पाच वर्षात सभासदांसाठी काय केले, याचीही दखल घेतली जात आहे. या चर्चेतून तिन्ही पॅनेलप्रमुखांचे पारडे कमी-जास्त होत आहे.
प्रचार सभेतून कृष्णा कारखान्याची लक्तरे तोडली जात आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु मतदान कसे करावे, याबाबत कोणीही मार्गदर्शन करत नाही. अनेक सभासदांचा समज फक्त तीनच मते द्यायची आहेत, असा झाला आहे. वास्तविक प्रत्येक सभासदाला २१ उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे, याची माहिती सभासदांना देणे गरजेचे आहे.