चौकी नावाला; कर्मचारी मिळेना गावाला !
By admin | Published: July 14, 2017 11:03 PM2017-07-14T23:03:24+5:302017-07-14T23:03:24+5:30
चौकी नावाला; कर्मचारी मिळेना गावाला !
माणिक डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : आगाशिवनगरला पोलिस चौकीचे स्थलांतर झाल्यापासून कायमच कुलपात बंद असते. मलकापूर शहारासाठी मंजूर असलेल्या पोलिस ठाण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे स्वतंत्र पोलिस ठाण्याचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे चाळीस हजारांवर लोकसंख्येच्या गस्तीसाठी दोन बिटमध्ये चारच कर्मचारी गस्त घालत असून, शहराची सुरक्षितता सध्या रामभरोसे आहे. याचा परिणाम म्हणून शहरात दिवसेंदिवस गुंडगिरी व बेकायदा व्यवसायांना ऊत आला आहे.
मलकापूर शहराची गेली दहा वर्षांत झपाट्याने वाढ झाली. २००८ मध्ये नगरपंचायत झाल्यापासून शहरात राहणाऱ्यांचा लोंढा वाढल्यामुळे शहराची लोकसंख्याही दुप्पट झाली आहे. ती आज ३२ हजारांवर गेली आहे. ज्या पद्धतीने शहरातील शैक्षणिक, विकासातील गुणात्मक व संख्यात्मक वाढ झाली तशीच या शहरातील पाठीमागील तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. दिवसेंदिवस शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यात भरच पडत आहे. बेकायदेशीर व्यवसायाने आपली पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अशांतता बिघडत असल्यामुळे तत्कालीन स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे शहरासाठी स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी केली. शहरात घडणाऱ्या घटना विचारात घेता शासन स्तरावरून मलकापूर शहरासाठी पोलिस चौकी मंजूर केली. नगरपंचायत कार्यालयासमोरील इमारत भाडेतत्त्वावर घेऊन या चौकीचे अधिकारी व नेत्यांच्या हस्ते थाटात प्रारंभही करण्यात आला. जेमतेम निवडणुकीचा कालावधी वगळता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दिवसच ही चौकी उघडली जाते. धूळ झटकून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व १ मे रोजी येथे ध्वजारोहन करण्यात येते. उर्वरित कालावधीत या चौकीतील टेबलावरचा धुळीचा थर वाढतच गेला.
शहरातील वाढती गुन्हेगारी विचारात घेता पुन्हा स्थानिक प्रशासनाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्याने मलकापूर शहरासाठी २०१४ मध्ये स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करून घेतले. २१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा व इमारतीचा आराखडाही तयार झाला. मात्र, तीन वर्षांत काहीच कार्यवाही झाली नाही.
मलकापुरातील पोलिस चौकीचे आठ वर्षांनंतर सहा महिन्यांपूर्वी आगाशिवनगरात स्थलांतर करण्यात आले. आगाशिवनगरातही उद्घाटनानंतरही पोलिस चौकी सहा महिन्यांपासून कुलपातच बंद आहे. पोलिसांनी कामकाजासाठी एकदाही या चौकीचा वापर केलेला नाही. मलकापूरसह आसपासच्या गावातील सुमारे चाळीस ते पन्नास हजारांवर लोकसंख्येच्या परिसरात केवळ चार ते सहाच पोलिस कर्मचारी गस्त घालत असतात. अशा अपुऱ्या पोलिस फौजफाट्यामुळे क्राईमरेट दिवसेंदिवस वाढत आहे.