शहापूर गावात बाहेरील लोकांना येण्यास बंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:11+5:302021-05-29T04:28:11+5:30
कोपर्डे हवेली : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असतानाच शहापूर (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीने ...
कोपर्डे हवेली : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असतानाच शहापूर (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीने कडक धोरणाची अंमलबजावणी केली असून, बाहेरील लोकांना गावात प्रवेश बंद केला आहे. त्यासाठी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेटची निर्मिती करून त्याठिकाणी ग्रामपंचायतीने कर्मचारी ठेवला आहे तर गावातील बाहेरून येणाऱ्या सुपुत्रांची आरोग्य विभागाकडून तपासणी बंधनकारक केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी ग्रामपंचायतीचा कर्मचारी गेटची उघड-झाक करत असतो तर बाहेरील लोकांसाठी हे गेट बंद असून, प्रवेश नाकारला जातो. गावातील ग्रामस्थ विनामास्क आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. बाहेरगावी नोकरीनिमित्त असलेल्या लोकांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाते. शिवाय त्याचा अहवाल काहीही असला तरी पंधरा दिवस गृह अलगीकरणाची सक्ती केली जाते. गावातील बाधित क्षेत्राकडे जाण्याची मनाई केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीबरोबरच गावातील युवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका आदी मेहनत घेत आहेत.
२८ कोपर्डे हवेली
फोटो ओळ... शहापूर (ता. कऱ्हाड) येथे बाहेरील लोकांना गावात प्रवेशबंदी असल्याने गेट तयार करण्यात आले आहे.