अंधपणावर डोळसपणे मात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:35 AM2021-01-21T04:35:18+5:302021-01-21T04:35:18+5:30
कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावातील सुनील आणि रेखा भोसले या दाम्पत्याची पीयूषा ही १५ वर्षांची मुलगी. जन्मत:च अंध; पण, कोकिळेसारखा ...
कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावातील सुनील आणि रेखा भोसले या दाम्पत्याची पीयूषा ही १५ वर्षांची मुलगी. जन्मत:च अंध; पण, कोकिळेसारखा गोड गळा तिला लाभला आहे. नियतीनं पीयूषाची दृष्टी हिरावून घेतली असली तरी, निसर्गानं तिला गोड गळ्याची देणगी दिलेली आहे. ती जेव्हा अभंग गाते, तेव्हा ऐकणारे भक्तिरसात न्हाऊन निघतात आणि पोवाडा सादर करते, तेव्हा त्यातील वीररसाने अंगावर शहारे उभे राहतात. अवघ्या आठव्या वर्षांपासून तिला गायनाची असलेली जाण आणि भानही आचंबित करणारे आहे.
पीयूषाचे वडील सुनील भोसले हे नोकरीनिमित्त साताऱ्यात स्थायिक झाले आहेत. आपल्या गोड गळ्याच्या पीयूषाबाबत ते म्हणतात ‘पीयू जन्मत:च दृष्टिहीन. तिचा जन्म झाला तेव्हा खूप वाईट वाटले. आमच्याच नशिबी असं का ? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यात काहूर माजविलेलं. पण, जे नशिबी आलं त्याचा स्वीकार तर केला पाहिजेच, या विचारानं आम्ही तिचं संगोपन केलं. तीन-चार वर्षांची असतानाच ती बडबड गीते म्हणायची. एवढेच काय, तर ती गाता-गाता स्वत:चं नाव गाण्यात लीलया मिसळायची. घरात गायनाचा वारसा नसतानाही निसर्गानंच तिला ही देणगी दिलेली आहे. याची जाणीव झाली आणि तिला संगीताचं शिक्षण द्यायचं ठरविलं. पहिल्यांदा संगीत शिक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्याकडे ती संगीताचे धडे शिकली, तर आता दीपा पाटील यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत आहे. तसेच शास्त्रीय गायनात उपांत्य विशारदसाठीही ती प्रवीष्ठ झाली आहे.
पोवाडा गायन हा अवघड प्रकार पीयूषानं कसा आत्मसात केला, याबाबत सुनील भोसले म्हणतात, ‘काही वर्षांपूर्वी आम्ही प्रतापगडावर गेलो होतो. तेव्हा गडावर शाहीर बाबासाहेब देशमुख यांचे पोवाडे रेकॉर्डवर सुरू होते. तिने आम्हाला पोवाड्याची सीडी घ्यायला लावली. त्यातील ‘गड आला, पण सिंह गेला’ आणि ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ हे पोवाडे ती सादर करते, तेव्हा अचूक शब्दफेक, स्वरावरील पकड, त्यातील चढ-उतार, स्पष्टता आणि ऐकूणच सादरीकरण एवढे प्रभावी होते की, अंगावर रोमांच उभे राहतात, अशाच प्रतिक्रिया मिळत असतात.
शालेय शिक्षणातही ती उजवी ठरत आहे. सध्या पीयूषा साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात दहावीत शिकत आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत तर तिने ब्राँझ पदक मिळवले आहे. या विद्यालयातील ती पदक मिळविणारी पहिली विद्यार्थी ठरली आहे.
चौकट :
आतापर्यंत ९९ कार्यक्रम...
पीयूषाचे आतापर्यंत ९९ कार्यक्रम झाले आहेत. पुणे, ठाणे, मुंबई, नांदेड, हिंगोली, परभणी येथे हे कार्यक्रम झालेत. तसेच महाराष्ट्राबाहेर कर्नाटकातही कार्यक्रम झाला आहे. सातारा आकाशवाणीवरही तिला गायनाची संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी तिचा गौरव होतो. पीयूषाला मोठा भाऊ आशितोष हा साथसंगत करतो. पीयूनं जे मिळविलं आहे, ते आयुष्यात आम्हाला कधीच जमलं नसतं. तिनं आठव्या वर्षापासूनच आपली ओळख निर्माण केलेली आहे. आज आम्हाला पीयूचे आई-बाबा या नावानेच ओळखतात. १५ वर्षांपूर्वी जो प्रश्न पडला होता की, ‘आमच्याच नशिबी असं का?’ याचं उत्तर आता मिळाल्यासारखं वाटतंय.
चौकट :
गावानेही केला सन्मान...
पीयूषानं आपल्या गायनानं सर्वांना मोहिनी घातली आहे. वीररसाने भरलेले शब्द आणि डफावर पडणारी थाप हृदयाचा ठाव घेते. याचा अभिमान शिरंबे या गावालाही आहे. गावातील श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बालशाहीर पीयूषाला मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
कोट :
मला गायनाची आवड आहे. यासाठी माझ्या घरच्यांचाही मला पूर्ण पाठिंबा मिळतो. त्यामुळेच या क्षेत्रात करिअर करण्याचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक परिश्रम घेत आहे. याशिवाय समाजासाठीही काही तरी करण्याची माझी इच्छा आहे.
- पीयूषा भोसले
फोटो दि.२०सातारा पियुषा भोसले फोटो...
..............................................................