दूषित पाण्यावर मात; ताईगडेवाडीत ‘वॉटर एटीएम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:14+5:302021-07-10T04:27:14+5:30
मराठवाडी धरणाच्या बुडित क्षेत्रातील अनेक गावे सातारा व सांगली जिल्ह्यात स्थलांतरीत झालेली आहेत. त्यातील घोटीलचे पुनर्वसन स्थानिक ठिकाणी ताईगडेवाडीजवळ ...
मराठवाडी धरणाच्या बुडित क्षेत्रातील अनेक गावे सातारा व सांगली जिल्ह्यात स्थलांतरीत झालेली आहेत. त्यातील घोटीलचे पुनर्वसन स्थानिक ठिकाणी ताईगडेवाडीजवळ झाले असून दहा वर्षांपासून प्रकल्पग्रस्त कुटुंबे तेथे वास्तव्यास आहेत. दहा वर्षे उलटूनही समस्यांचा फेरा न सुटल्याने अनेक अडचणींशी त्यांचा सामना सुरू असून अस्वच्छ पाणीपुरवठा ही त्यापैकीच एक समस्या आहे. गावच्या सार्वजनिक नळ योजनेची विहीर खळे गावाजवळ वांग नदीकाठावर असून गर्द झाडीमुळे पालापाचोळा तसेच पक्षी व वानरांची विष्टा पाण्यात पडून विहिरीतील पाणी अस्वच्छ होते. गावात निर्माण झालेला हा आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसहभागातून शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेऊन तातडीने त्याची अंमलबजावणी केली. या प्रकल्पातून पाच रुपयांत तीन लिटर शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत असल्याने स्थानिकांसह आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, सहाय्यक अभियंता रोहिणी चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रियांका वाघमोडे आदी उपस्थित होत्या.
फोटो : ०९केआरडी०४
कॅप्शन : ताईगडेवाडी (ता. पाटण) येथे जलशुद्धिकरण प्रकल्प उभारण्यात आला असून प्रकल्पातून ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होत आहे.