स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिमारा ठरतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:40 AM2021-05-07T04:40:54+5:302021-05-07T04:40:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना उपचारांत डॉक्टरांनी ठरवलेल्या औषधांचा वापर रूग्णाच्या गरजेनुसार केला. ज्याचे दुष्परिणाम कोरोनातून बरे झाल्यानंतरही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना उपचारांत डॉक्टरांनी ठरवलेल्या औषधांचा वापर रूग्णाच्या गरजेनुसार केला. ज्याचे दुष्परिणाम कोरोनातून बरे झाल्यानंतरही दिसून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी स्टेरॉईड वापरले गेले. पण त्यामुळेच रूग्णाची सामान्य रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे रूग्ण सर्रास सीटी स्कॅनही करताना दिसतात. या माध्यमातूनही शरिरावर घातक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर स्टेरॉईड आणि सीटी स्कॅनच्या वापरावर नियंत्रण घालावे, असे सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोना विषाणूचा होणारा गुणाकार रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळावे यासाठी आणि त्यातून रूग्ण पूर्णपणे बरा व्हावा यासाठी स्टेरॉईड वापरले गेले. संसर्गाची तीव्रता जास्त असते तेव्हा स्टेरॉईडचा वापर केला जातो. स्टेरॉईड हा शरिरातील महत्त्वपूर्ण घटक असून, तो एक हार्मोनसुध्दा आहे. पण जेव्हा इन्फेक्शनची तीव्रता वाढते तेव्हा हे स्टेरॉईड कमी पडल्यामुळे बाहेरून द्यावे लागते. तोंडावाटे किंवा इंजेक्शनमधूनही स्टेरॉईड दिले जाते. पण कोरोना काळात स्टेरॉईडने चांगली भूमिका बजावली, याबाबत काहीच शंका नाही. मात्र, यामुळे रूग्णाच्या शरिरातील साखरेची पातळी वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चौकट :
बुरशीजन्य आजारांचा धोकाही कायम
उत्तेजकांचा वापर आणि अनियंत्रित मधुमेह यामुळे कोरोनाबाधितांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग हवा किंवा मातीतून होतो. रोगप्रतिकारशक्ती सक्षम असलेल्यांना यापासून धोका नाही. परंतु, रोगप्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रूग्णांना तीव्र धोका असतो.
नाकावाटे ही बुरशी शरिरात प्रवेश करते. तेथून ती चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या हवेच्या पोकळीत अर्थात सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलदगतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेश करते. त्यामुळे इतर बुरशींच्या आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक आहे. म्युकरमायकोसिस शिवायही ‘अस्परगिलॉसिस’ आणि ‘कॅन्डिडियासिस’ हे बुरशीजन्य आजार कोरोनाबाधितांमध्ये आढळले आहेत.
साखरेची पातळी वाढली तरी स्टेरॉईड रूग्णांना दिले आहे. कारण वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करता येते. दरम्यान, स्टेरॉईडचा वापर सरसकट करणे बंद केले पाहिजे. गर्भवती मातांना झालेल्या संसर्गाचे निरीक्षण केल्यानंतरच त्यांना स्टेरॉईडचे उपचार दिले जाते. मातेचा जीव धोक्यात आल्यास हे उपचार टाळले जातात, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
एक सीटी स्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे
एक सीटी स्कॅन म्हणजे जवळपास ८० ते १४० एक्स-रे काढण्यासारखे आहे. त्याचे दुष्परिणाम शरिरावर होऊ शकतात. सतत सीटीस्कॅन केल्याने धोका निर्माण होऊ शकतो. जे रूग्ण सतत सीटी स्कॅन करत असतील त्यांना कर्करोगासारख्या आजाराचा धोका संभवतो.
कोरोना विषाणूचा संसर्ग अतिप्रमाणात झाला असेल, फुफ्फुसांपर्यंत संसर्ग झाला असेल तरच या दोन्ही उपचारांची गरज भासते. कोरोनाची तीव्र लक्षणे असल्यास सीटी स्कॅनची गरज भासते. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना याची गरज नाही. भीतीने सीटी स्कॅन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेय, हे नक्की. मात्र, त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉक्टरांना रूग्णांचे समुपदेशन करून मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अनिरूध्द जगताप यांनी व्यक्त केले. ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल सामान्य असल्यास, सौम्य संसर्ग असल्यास सीटी स्कॅन करण्याचे कोणतेही कारण नाही.
...................