गाळामुळे जलयुक्तचे बंधारे ‘ओव्हरफ्लो’!

By admin | Published: October 15, 2016 11:47 PM2016-10-15T23:47:40+5:302016-10-15T23:47:40+5:30

बोडकेवाडी-उरूलवर यावर्षीही टंचाईचे संकट : गाळ काढण्यास शासनाची अनास्था; गवतामुळे जनावरांचा वावर

Overflow bunds for wetlands! | गाळामुळे जलयुक्तचे बंधारे ‘ओव्हरफ्लो’!

गाळामुळे जलयुक्तचे बंधारे ‘ओव्हरफ्लो’!

Next

मल्हारपेठ : जलयुक्त शिवार योजनेतील बोडकेवाडी-उरूल, ता. पाटण गावास दुर्लक्षतेमुळे यावर्षीही भीषण पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. शासन गाळ काढण्यासाठी फक्त डिझेल तेलास ६० टक्के रक्कम देतो, असे सांगत आहे. त्यामुळे ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या ४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व ११ मातीचे बंधारे २० फूट गाळाने भरून ओढ्याप्रमाणे वाहत असून, पंधरा दिवसांत कोरडे पडतील. सध्या तेथे गवत असून जनावरांचा वावर आहे. मुबलक पाऊस पडूनसुद्धा चालू वर्षीही भीषण पाणीटंचाईला गावाला समोरे जावे लागणार असल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पाटण तालुक्यातील ९ गावे जलयुक्त शिवारसाठी निवडली असून, मल्हारपेठपासून सहा किलोमीटर अंतरावर डोंगराच्या शेजारी ९०० लोकसंख्या असणाऱ्या बोडकेवाडी-पांडवनगर गावाची जलयुक्त शिवार योजनेत निवड झाली आहे. जलयुक्तमुळे गावातील १३२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते. फेब्रुवारी महिन्यात निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. शासनामार्फत बैठका झाल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी गाव टंचाई मुक्त होईल, असे सांगितले. कृषी विभागाने अंदाजे ११ लाख रुपये खर्चाचा अहवाल तयार केला. वन विभागामार्फत दोन नवीन बंधारे बांधतो, असे सांगितले. शिवार फेरी व कृषी दिंडी काढली. त्यानंतर वन विभाग फिरकलाही नाही.
१५ बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत कृषी विभागाकडे सतत पाठपुरावा केला असता जेसीबी सोडून फक्त ६० टक्के खर्च तोही डिझेल तेलासाठी लागणारा शासन देईल. बाकी लोक वर्गणीतून घालावा लागेल, अशी उत्तरे मिळाल्यामुळे मुबलक पाऊस पडूनही २०फूट भिंंतीपर्यंत भरलेल्या गाळावरून पाणी वाहून जात आहे. मातीचे बंधारे कोरडे पडले असून, त्यामध्ये शेजारी शेतकऱ्यांनी वैरणीसाठी गाळामध्ये उन्हाळी मका पेरली आहे. थोडेसे येणारे पाणी ओढ्याप्रमाणे वाहून जात आहे. शासनाने भिजत घोंगडे ठेवल्यामुळे अजून १५ दिवसांनंतर थेंबभर पाणी उरणार नाही. संपूर्ण बंधारे कोरडे पडतील. काही बंधारे आजही कोरडे पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून पाऊसकाळ कमी होत गेल्यामुळे उन्हाळ्यातील दोन महिने बोडकेवाडीत तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. गावात ३ सार्वजनिक विहिरी असून, १ कूपनलिका आहे. शेती कोरडवाहू असल्याने उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गतवर्षी ग्रामपंचायतीने शासनाकडे टँकरची मागणी केली होती. तर विहिरी अधिग्रहणावरूनही बराच वाद झाला होता. त्यामुळे शासनाने बोडकेवाडी गाव जलयुक्त शिवारात घातले खरे मात्र शासनाच्या दुर्लक्षतेमुळे चालू वर्षीही उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. चालू वर्षी काम न झाल्याने शेतीला मिळणाऱ्या पाण्याचे स्वप्न भंग पावले आहे.
जलयुक्त शिवार योजनेतून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम झाले असते तर गावाचे नंदनवन झाले असते. पाणी प्रश्नही मिटला असता. लोकांनी भात, गहू, उन्हाळी भुईमूग व इतर पिके घेतली असती. गावातील सार्वजनिक व वैयक्तिक मालकीच्या विहिरींना पाणीही वाढले असते. शासनाच्या कचखाऊ धोरणामुळे बोडकेवाडी टंचाईमुक्त होईल का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवारमार्फत कोट्यवधी रुपयांची कामे झाली असे सांगणाऱ्या शासकीय यंत्रणेसह जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष येऊन बोडकेवाडीचा प्रश्न पाहावा व गाळ काढण्याबाबत काही तरी निर्णय घ्यावा, असे मत तरुण, महिला, ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
आधी स्वागत, आता संताप
‘जलयुक्त शिवार हा शासनाचा देखावा असून, हातावर देऊन कोपरावर मारण्याचा प्रकार आहे. योजनेचे ग्रामस्थांनी फटाक्या वाजवून स्वागत केले. त्याच ग्रामस्थांच्यातून संताप व्यक्त होत आहे. चालू वर्षी जास्त पाऊस पडूनही असेच ऊन वाढत गेले तर बंधारे १५ दिवसांत कोरडे पडतील. लोकवर्गणीतून अनेक कामे केली असून, १२ लाखांची भारत निर्माणमधून पाणी योजना केली. आता ग्रामस्थ लोकवर्गणी देण्यास तयार नाहीत,’ असे ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: Overflow bunds for wetlands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.