पाटणमध्ये लग्नसराईत ५० लाखांना गंडा मून होम निड्सचा मालक पसार
By admin | Published: May 18, 2014 12:08 AM2014-05-18T00:08:37+5:302014-05-18T00:10:37+5:30
पाटण : मून होम निड्स दुकानाच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात टीव्ही, मोबाइल, फ्रीज, कपाट अशा संसारोपयोगी साहित्य देण्याचे आमिष
पाटण : मून होम निड्स दुकानाच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात टीव्ही, मोबाइल, फ्रीज, कपाट अशा संसारोपयोगी साहित्य देण्याचे आमिष दाखवलेली व्यक्ती पसार झाली आहे. यामुळे सुमारे ५०० लोकांची फसवणूक झाली असून, त्याने ५० लाखांचा गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे. ऐन लग्नसराईतच ही घटना घडल्याने बंद असणार्या दुकानासमोर ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोहंमद गणी मोहंमद सुलेमान या नावाच्या व्यक्तीने पाटणजवळ दि. २४ एप्रिल रोजी संसारोपयोगी साहित्य मिळण्याचे दुकान थाटले होते. मून होम निड्स असे नाव असलेल्या या दुकानात ५० टक्के सवलतीच्या दरात बुकिंगनंतर १० दिवसांच्या आत साहित्य मिळणार होते. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, मोबाइल, कपाट, इस्त्री व इतर संसारोपयोगी साहित्याचा समावेश होता. प्रथम काहीनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्यांनतर अनेकांनी पाच हजारांपासून ५० हजारांपर्यंत रक्कम जमा केली. मात्र, शुक्रवार, दि. १६ रोजी सुलेमान दुकान बंद करून पसार झाला. शनिवारी सकाळी हे दुकान बंद असल्याचे पाहून लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्वत्रच खळबळ उडाली. याबाबत कांचन जगन्नाथ पाटील (रा. चाफळ, ता. पाटण) यांनी पाटण पोलिसांत तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)