ग्रामीण रुग्णालयात होणार ऑक्सिजन प्लांटची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:24+5:302021-06-06T04:29:24+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत गेला. दिवसेंदिवस बाधित रुग्णसंख्या घटत असली तरी कोरोनाच्या पुढच्या लाटेत ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत गेला. दिवसेंदिवस बाधित रुग्णसंख्या घटत असली तरी कोरोनाच्या पुढच्या लाटेत रुग्णांना उपचार चांगले मिळावेत, यासाठी खंडाळा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रुग्णालयाच्या जागेची पाहणी करून तातडीने हे काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे ऑक्सिजन सुविधा निर्माण झाल्यानंतर दिलासा मिळणार आहे.
खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत तसेच कोविड कालावधीत जनतेला आधार मिळावा म्हणून ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह एकूण तीस बेडची व्यवस्था आहे. मात्र, रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारल्यास सातत्याने ऑक्सिजन पुरवठ्याची सोय होणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाशेजारील जागेत हा प्लांट उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता.
या जागेची पाहणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी करून योग्य त्या सूचना केल्या. यावेळी तहसीलदार दशरथ काळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र कोरडे, डॉ. कुणाल यलमार, दत्तात्रय खंडागळे उपस्थित होते.
०५ खंडाळा
फोटो - खंडाळा येथील ऑक्सिजन प्लांटच्या जागेची जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाहणी केली. यावेळी दशरथ काळे, डॉ. रवींद्र कोरडे, डॉ. कुणाल यलमार, दत्तात्रय खंडागळे उपस्थित होते.