शासकीय रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लांट जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:05+5:302021-05-08T04:42:05+5:30
फोटो : जिल्हा परिषद... लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत ...
फोटो : जिल्हा परिषद...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. याचा विचार करून जिल्ह्यातील काही शासकीय रुग्णालयांत करण्यात येणारे ऑक्सिजन प्लांट जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि जलसंधारण समितीची सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही माहिती देण्यात आली. या दोन्हीही सभा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झाल्या.
जिल्हा परिषदेतून अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते; तर समिती सदस्यांनी आपापल्या तालुक्यातून सहभाग घेतला.
सुरुवातीला जलसंधारण समितीची सभा झाली. या सभेत मागील विषयांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर स्थायी समितीची सभा झाली. यामध्ये कोरोना विषाणूविषयकच चर्चा अधिक प्रमाणात झाली.
कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. दररोज रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा सक्षम करणे महत्त्वाचे आहे. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, यावर सभेत चर्चा झाली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यात येणार आहेत. जुलैपर्यंत हे प्लांट पूर्ण होतील, असे सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आणि विविध उपाययोजना करण्यावर या सभेत चर्चा करण्यात आली.
.............................................................