कऱ्हाडात हवेतून ऑक्सिजन निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:45 AM2021-09-17T04:45:38+5:302021-09-17T04:45:38+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते. ...
कऱ्हाड : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते. शिवाय ऑक्सिजनच्या मागणीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता हवेतून ऑक्सिजन तयार करणारे प्लांट राज्यात उभारण्यात येत आहेत. कऱ्हाडलाही असा प्लांट अंतिम स्वरूप घेत असून, प्लांटचे साहित्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने जम्बो कोविड सेंटरसह हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याची तयारी सुरू केली आहे. असे प्लांट जिल्ह्यात दोन ठिकाणीच उभारले जाणार आहेत. कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातही या प्लांटसाठीचे साहित्य दाखल झाले आहे. मोठ्या क्रेनच्या मदतीने चार ऑक्सिजन टँक प्लांटवरती बसवण्यास प्रारंभ झाला आहे. सुमारे शंभर सिलिंडर ऑक्सिजन या प्लांटमधून दररोज उपलब्ध होणार आहेत. गत तीन महिने यासाठी काम सुरू आहे. लवकरच तांत्रिक अडचणी पूर्ण करीत हा प्लांट कार्यान्वित होणार आहे.
वाढत्या कोरोना संसर्गामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये, यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. महापालिका क्षेत्रात साधारणत: एका प्लांटमधून दररोज सुमारे दोन टन ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो.
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ठिकाणी लिक्विड टँकसाठीची उभारणी सुरू आहे. हवेतून निर्मिती झालेला ऑक्सिजन या टँकमध्ये स्टोअर करता येणार आहे. त्यातून ऑक्सिजनचा स्वच्छ व सुरळीत पुरवठा होणार आहे. कोरोना काळात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसाठी मंजुरी दिली असून, जम्बो कोविड सेंटरसह ऑक्सिजन निर्मिती प्लांटसाठी पुढाकार घेऊन जागा निश्चित करीत आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.
- चौकट
...अशी होणार ऑक्सिजन निर्मिती
ऑक्सिजननिर्मिती प्लांटच्या ठिकाणी हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्यातील नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्साइड बाजूला करून जम्बो सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवला जाणार आहे. प्रतिदिनी १०० सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.