औंध ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:43+5:302021-05-27T04:40:43+5:30
औंध : औंध येथील कोरोना सेंटरमध्ये मंगळवारी रात्री ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने एकच खळबळ उडाली. वेळेचे गांभीर्य ओळखून ...
औंध : औंध येथील कोरोना सेंटरमध्ये मंगळवारी रात्री ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने एकच खळबळ उडाली. वेळेचे गांभीर्य ओळखून तातडीने १५ रुग्णांना वडूज, मायणी या ठिकाणी हलविण्यात आल्यामुळे रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ऑक्सिजन यंत्रणेत आवाज येऊ लागला. ऑक्सिजन यंत्रणा अतिउच्चदाबात गेल्याने आतील व्हॉल्व्ह खराब झाले व ऑक्सिजनची गळती होऊ लागल्याने यंत्रणा तातडीने बंद करण्यात आली. औंध येथील कोरोना सेंटरमध्ये एकूण ३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी १५ रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असल्याने १०८ ला संपर्क साधून तीन ते चार रुग्णवाहिका बोलावून त्यामध्ये उर्वरित वय वर्षे ४० ते ६५ मधील १५ रुग्णांना हलविण्यात आले. यामध्ये वडूज ग्रामीण रुग्णालयात २, जयश्री हॉस्पिटल, वडूज येथे ८, तर मायणी येथील सेंटरमध्ये ५ रुग्णांना नेण्यात आले.
रुग्णालय प्रशासनाने वेळेचे गांभीर्य ओळखून वेळीच निर्णय घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मंगळवारी रात्रीपासूनच ऑक्सिजन यंत्रणेच्या दुरुस्तीला सुरुवात झाली असून, यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर असणाऱ्या रुग्णांना नंतर औंधच्या कोरोना सेंटरला आणण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. विलास साळुंखे, माजी सभापती संदीप मांडवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माने, डॉ. संतोष मोरे, डॉ. सम्राट भादुले व वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्ण सुखरूप असल्याची माहिती डॉ. विलास साळुंखे यांनी दिली.
(कोट)
तांत्रिक बिघाडामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाड निर्माण झाल्याचे समजताच औंध ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन आधी तेथील १५ रुग्णांना तातडीने मायणी मेडिकल कॉलेज, जयश्री हॉस्पिटल आणि वडूज ग्रामीण रुग्णालय येथे सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी व इतर प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.
-किरण जमदाडे, तहसीलदार, खटाव (वडूज )