पी. बी. सरांमुळे ‘पंचायत राज’ला बळकटी

By admin | Published: January 15, 2017 11:33 PM2017-01-15T23:33:07+5:302017-01-15T23:33:07+5:30

पोपटराव पवार : शांतिनिकेतन लोकविद्यापीठात ‘कर्मयोगी’ पुरस्काराने गौरव

P. B Strengthened 'Panchayat Raj' due to Saras' | पी. बी. सरांमुळे ‘पंचायत राज’ला बळकटी

पी. बी. सरांमुळे ‘पंचायत राज’ला बळकटी

Next



सांगली : गाव स्वयंपूर्ण होण्याबरोबरच ग्रामविकासाची सांगड शेतीबरोबर घातल्यास विकासाला निश्चित दिशा मिळणार आहे. ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अवतरण्यासाठी ग्राम संस्कृती व कृषी संस्कृती एक व्हायला हवी. यासाठी पंचायत राज व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडविणारे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे विचार अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामसुधारक व हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरम आणि शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘कर्मयोगी’ व ‘माई’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ‘कर्मयोगी’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अशा संकल्पना राबवूनही राज्यातीलच नव्हे, तर देशातील टंचाईची परिस्थिती कायम आहे. उपलब्ध पाण्याचाच वापर करून पिकांचे नियोजन करण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. ग्रामविकास व कृषी एकत्र जोडल्यास खऱ्याअर्थाने खेडी स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. यासाठीच प्राचार्य पी. बी. पाटील यांनी ग्राम न्यायालयासह सुचविलेल्या इतर शिफारशी आजही उपयुक्त आहेत. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी आवश्यक आहे. गाव अधिक सक्षम करण्यासाठी प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या समितीने सुचविलेले १५८ मुद्दे उपयोगी आहेत.
आजकाल गावे असुरक्षित बनू लागली आहेत. डॉल्बीवर पहाटे तीनपर्यंत नाचणाऱ्या आणि व्हॉटस्-अ‍ॅपवर चॅटिंग करणाऱ्या मुलांना थांबविण्याची धमक कोणातही राहिलेली नाही. गावच्या पारावर बसणारी गावची भारदस्त माणसे कमी झाल्यानेही ही वेळ आली आहे. नुसतेच अत्याधुनिक तंत्र विकास करू शकत नाही. संस्कार संपले तर गावे उद्ध्वस्त होतील, असा इशाराही पवार यांनी दिला.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, पोपटराव पवार यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रदान केल्याबद्दल खऱ्या अर्थाने प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या विचाराने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा गौरव झाला आहे. हरितक्रांतीचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी १९०४ मध्ये सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर केले होते. गेल्या दहा वर्षापासून संपूर्ण राज्य होरपळत असताना, कोल्हापूर जिल्ह्यात टंचाई नाही, यावरून शाहू महाराजांची दूरदृष्टी दिसून येते.
साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले की, शांतिनिकेतन नसते, तर अनेकांची अवस्था पंख गळालेल्या पक्ष्यासारखी झाली असती. निसर्गाने दिलेली नाळ याच परिसरात पुरून आपण बाहेर पडलो आहे. त्यामुळे ही नाळ मॅग्नेटचे काम करत असल्यानेच, आजही माजी विद्यार्थी आस्थेने शांतिनिकेतनमध्ये येतात, रमतात. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शिकवणुकीमुळे आयुष्याचे ओझे कधी वाटलेच नाही. जगण्याचे, लढण्याचे व समाजाला समजून घेण्याचे शिक्षण याठिकाणी मिळाले.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले की, गावाला मोठे करूनही मोठे होता येते, याचे दुर्मिळ उदाहरण म्हणजे पोपटराव पवार आहेत. भारतातील सर्वात चांगले गाव निर्माण करण्यात पवार यशस्वी झाले आहेत. दुसऱ्यांना आयुष्य दिले, तर आयुष्याची माती न होता सोने होते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
सुरूवातीला नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विशाल पाटील, वंदना गायकवाड, शीला निकम, तानाजीराव मोरे, बी. आर. थोरात, डॉ. अविनाश पाटील, डॉ. मोहन पाटील, गिरीश शरनाथे, दिनकर साळुंखे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोपटराव पवार यांनी यावेळी वसंतदादा पाटील, प्राचार्य पी. बी. पाटील आणि माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणी जागविल्या. राज्यपातळीपर्यंत क्रिकेट खेळले असल्याने, मुंबईत वसंतदादा मुख्यमंत्री असताना मंत्रालयात एकदा त्यांची भेट घेतली होती. त्यांनी केवळ दोन वाक्यात दिलेल्या राजीनाम्याची बातमी आजही माझ्या संग्रही आहे. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्याजवळ बसण्याचा योग एकदा आला होता, तो संस्मरणीय क्षण मी समजतो. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी तर जिव्हाळ्याचा संबंध होता. तंटामुक्ती अभियानाचा कच्चा मसुदा हिवरे बाजारच्या ग्रामसंसदेत आबांनी तयार केला होता. गाडगेबाबा अभियान असो अथवा बाहेरच्या राज्याची कोणतीही व्यक्ती आली की, आबा मोठ्या प्रेमाने त्यांना हिवरे बाजार बघायला पाठवत असत.
समिता पाटील यांना ‘माई’ पुरस्कार
पोपटराव पवार यांच्याहस्ते यावेळी ‘माई’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात संस्थेच्या शिक्षक संवर्गातून समिता गौतम पाटील यांना ‘शिक्षक माई’ पुरस्कार, तर सेवानिवृत्त ग्रंथपाल भीमराव पाटील यांना ‘शिक्षकेतर माई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्क म असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पोपटराव पवार यांनी यावेळी वसंतदादा पाटील, प्राचार्य पी. बी. पाटील आणि माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणी जागविल्या. राज्यपातळीपर्यंत क्रिकेट खेळले असल्याने, मुंबईत वसंतदादा मुख्यमंत्री असताना मंत्रालयात एकदा त्यांची भेट घेतली होती. त्यांनी केवळ दोन वाक्यात दिलेल्या राजीनाम्याची बातमी आजही माझ्या संग्रही आहे. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्याजवळ बसण्याचा योग एकदा आला होता, तो संस्मरणीय क्षण मी समजतो. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी तर जिव्हाळ्याचा संबंध होता. तंटामुक्ती अभियानाचा कच्चा मसुदा हिवरे बाजारच्या ग्रामसंसदेत आबांनी तयार केला होता. गाडगेबाबा अभियान असो अथवा बाहेरच्या राज्याची कोणतीही व्यक्ती आली की, आबा मोठ्या प्रेमाने त्यांना हिवरे बाजार बघायला पाठवत असत.
पुरस्काराचे पैसे सामाजिक संस्थांना
कार्यक्रमात पोपटराव पवार यांना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पवार यांनी पुरस्काराच्या रकमेतील ५० हजार रूपये इंद्रजित देशमुख यांच्या घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथील चेतना संकुलाला, तर उर्वरित ५० हजार रूपये डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमला देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
विकासासाठी सैराट व्हा!
आजचे तरुण संस्कारहीन आहेत, हा समज चुकीचा असून, देशभरातील युवक आमच्या गावाला भेट देतात व प्रेरणा घेऊन जातात. त्यामुळे तरूणांनी सैराट जरूर व्हावे, पण देशाच्या, गावाच्या विकासासाठी, व्यसनमुक्त जीवनासाठी सैराट व्हावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

Web Title: P. B Strengthened 'Panchayat Raj' due to Saras'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.