सत्ताधाऱ्यांना न जमले ते प्रशासनाने केले, पाचगणीकर जनतेत समाधानाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 05:54 PM2022-01-31T17:54:14+5:302022-01-31T17:54:53+5:30
प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाचगणीकर नागरिकांत विकासात्मक अधिकारी म्हणून प्रतिमा उजळ झाली
पाचगणी : ‘कोरोना काळात शहरांतर्गत रस्त्यांची दुर्दशा झालेली असताना त्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देणे अपेक्षित असताना सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासकीय कारभार सुरू झाला. याच प्रशासकीय कारभारात नागरिकांच्या जिव्हाळ्याचा शहरांतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून सत्ताधाऱ्यांना सत्तेत जमलं नाही ते प्रशासनाने करून दाखवले आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाचगणीकर नागरिकांत विकासात्मक अधिकारी म्हणून प्रतिमा उजळ झाली आहे. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचे कौतुक होत आहे. पाचगणी नगरपरिषदेत आगामी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम लागला आहे. कार्यकाळ संपताच सत्ताधाऱ्यांची सत्ता बरखास्त झाली आहे. प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे.
कोरोना काळात शहर विकासाच्या अनेक कामांना खीळ बसली आहे. याकरिता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या पायात पाय घातल्याने सत्ताधाऱ्यांना काम करता आले नाही असे म्हटलं गेले आहे. त्यामुळे जनतेला अपेक्षित कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामध्ये शहरअंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे शहरात प्रवास करताना नागरिकांचा जीव मेटाकुटीस येत होता.
सत्ताधारी सत्तेवरून पायउतार होताच पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू झाला. लोकांच्या जिव्हाळ्याचा रस्त्याचा प्रश्न मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी जागेवर उभे राहून मार्गी लावल्याने अनेक दिवस खितपत पडलेले शहर हद्दीतील खिंगर रोड गावठाणमधील रस्ते खड्डेमुक्त झाल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे.
हायवेचा फील
हा रस्ता चांगला झाल्याने यावर मध्यभागी डिव्हायडर पांढरे पट्टे मारले आहेत. झेब्राक्रॉसिंगमुळे हायवेचा फील येत आहे. सुसाट वेगाने जाणाऱ्यांना आता जागोजागी केलेल्या गतिरोधकांमुळे ब्रेक लागत आहे.
उमेदवारांचा विकासाचा मुद्दा हिरावला
ही कामे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सेवेत झाल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचा विकासाचा मुद्दा हिरावला गेला आहे.
जनता लक्षात ठेवते
कोरोना काळात लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षित असणारी मदत लोकांना पोहोचली का? लोक असे मुद्दे निवडणुकीच्या अनुषंगाने लक्षात ठेवतात. पडत्या काळात विचारपूस कोणी केली, हे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.