भातशेती ठरतेय सुवर्णकाळ!
By admin | Published: July 1, 2015 10:31 PM2015-07-01T22:31:33+5:302015-07-02T00:28:50+5:30
पेरणी सुरू : पाटण तालुका खरीप हंगाम
पाटण : पाटण तालुका दुर्गम व डोंगराळ आणि कड्याकपाऱ्यांनी व्यापला असल्याने या ठिकाणी भातखाचराच्या शेतीला प्राधान्याने महत्त्व दिले जाते. त्यामुळे पावसाळ्यातील खरीप हंगाम हा येथील शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ बनून जातो. भातपिकाबरोबरच ज्वारी, सोयाबीन, उडीद, नाचणी, भुईमूग, वरी, चवळी आदी पिके खरीप हंगामात घेतली जातात. सध्या शेतकरी पेरणीत मग्न असून, डोंगराळ भागातील गावांमध्ये भात, नाचणी तर सखल भागांमध्ये ज्वारी, हायब्रिड, सोयाबीन आदी पिकांची प्रामुख्याने पेरणी सुरू आहे.पाटण तालुक्यात चढ उताराच्या शेतजमिनींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लांबलचक शेतजमिनीऐवजी छोटे-छोटे जमिनींचे तुकडे त्यात बैलजोडीच्या साह्णाने खरीप पिकांची लागवड केली जात आहे. मोरगिरी, कोयन, मणदुरे, ढेबेवाडी या विभागातील दुर्गम भागांमध्ये अशा चढ उताराच्या शेतजमिनींमध्ये भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यासाठी बाजारात आलेले नवीन सुधारित बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तसेच खते, कीटकनाशके देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत. सेंद्रिय खताचा वापर दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे.
या उलट तालुक्यातील मल्हारपेठ, मारुल हवेली, नवारस्ता, तारळे, विहे या परिसरात लागवड सुरू असून, खरीप पिकांमध्ये सोयाबीन, हायब्रिड, ज्वारी ही पिके घेतली जातात. (प्रतिनिधी)
पारंपरिक पिकांकडे कल...
डोंगराळ भागात अजूनही नाचणी, वरी ही पारंपरिक पिके घेण्याचा कल शेतकऱ्यांमध्ये आहे. ढेबेवाडीचा फसणी, निवी, वाल्मिक पठारावरील गावे तर मोरगिरी भागातील पांढरेपाणी, पाचगणी, कोयना विभागातील मळे-कोळणे, पांथरपुंज, गोठणे, चाफ्याचा खडक यांसारख्या दुर्गम भागामध्ये भात, नाचणी आदी खरीप पिकांसाठी मशागत सुरू असल्याचे दिसते.
कृषी विभागाचे नियोजन कागदावरच...
पाटण तालुका कृषी विभाग व पंचायत समितीचा कृषी विभाग हा खरीप हंगामाच्या पिकांसाठी जय्यत असल्याचा देखावा फक्त कागदोपत्री दाखविला जात आहे. या विभागाचे कृषी अधिकारी पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन व मदत करत नसल्याचे दिसून येत आहे.