कोयना भागात भाताची लावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:56+5:302021-06-25T04:26:56+5:30

कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयना भागात गत दहा ते बारा दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ...

Paddy planting started in Koyna area | कोयना भागात भाताची लावणी सुरू

कोयना भागात भाताची लावणी सुरू

Next

कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयना भागात गत दहा ते बारा दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरूवात केली असून, शिवार गजबजून गेल्याचे दिसून येत आहे.

यंदा मे महिन्यापासूनच चक्रीवादळ व अवकाळी रूपाने काही दिवस वगळता पावसाने मुक्काम ठोकल्याने खरीपपूर्व मशागतीची कामे लवकरच उरकली. तसेच ७ जूननंतर होणारी तरवे पेरणी मे अखेरीपासूनच सुरू झाल्याने २१ दिवसांच्या कालावधीनंतर सुरू होणारी भात रोपांची लावणी काहीशी लवकर सुरू झाली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत आहे. गत चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असली तरी ओढे, नाल्याचे आडवे पाट किंवा वीज पंप, इंजिनची सोय असलेल्या शेतात भात लावणी सुरू झाली आहे.

२० ते २२ दिवसांपूर्वी पेरलेले तरू उपटून बैल अथवा यंत्राच्या साह्याने चिखलणी करून गुडघाभर चिखलात भाताची रोपे लावली जातात. लावण पध्दतीने भाताचे उत्पन्न चांगले मिळत असून, चिखलणी करताना तण चिखलात गाडल्याने एक भांगलण वाचते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी ही पारंपरिक पद्धतच अवलंबत आहेत. सह्याद्रीच्या रांगांमधून विस्तारलेल्या व पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना भागात निसर्गाशी संघर्ष करत उताराच्या जमिनीवर प्रामुख्याने भात, नाचणीची पिके घेतली जातात.

- चौकट

शेतीमध्ये पुन्हा पैरा पद्धत

लहरी निसर्ग, वन्यप्राण्यांचा उपद्रव व मजुरांच्या टंचाईमुळे येथील शेती पुरती अडचणीत आली आहे. दिवसेंदिवस शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पैरा पध्दत पुन्हा रूढ होऊ लागली आहे. पैरा पध्दतीत रोजंदारीवर कामावर न जाता एकावेळी अनेकांनी एकाच्या शेतात कामाला जायचे. एकमेकांना मदत करायची. त्यामुळे शेतीची काम योग्य वेळेत होत आहेत.

फोटो : २४ केआरडी ०२

कॅप्शन : पाटण तालुक्यातील कोयना भागात शिरळ येथे शेतकऱ्यांनी भाताच्या रोपांची लावणी सुरू केली आहे. (छाया : नीलेश साळुंखे)

Web Title: Paddy planting started in Koyna area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.