फलटणमध्ये पाडवा तर माणमध्ये दिवाळी !
By admin | Published: July 8, 2016 11:38 PM2016-07-08T23:38:58+5:302016-07-09T00:49:35+5:30
जिल्ह्यात आनंदोत्सव : एकाच दिवशी विधान परिषद सभापती पद आणि मंत्रिपद मिळाल्याने ‘दुधात साखर’
फलटण/ म्हसवड : शुक्रवारचा दिवस फक्त सातारा जिल्ह्याचा होता. राज्यातील दोन मोठी पदे जिल्ह्याच्या पदरात पडली. रामराजे नाईक-निंबाळकर पुन्हा एकदा विधान परिषद सभापती झाले तर महादेव जानकर यांच्या रूपाने माण तालुक्याला इतिहासात प्रथमच मंत्रिपद मिळाले.
‘रामराज्य’ आणि ‘गुढीपाडवा’ यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे शुक्रवारी फलटण तालुक्यात पुन्हा एकदा ‘रामराज्य’ आल्याच्या आनंदातून जणू ‘गुढीपाडवा’ साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी फटाके उडविण्यात आले. फलटणमध्ये जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पेढेही वाटले. माण तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या रूपाने मिळाली आहे. जानकर यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून व भंडाऱ्याची उधळण करीत आनंद साजरा करण्यात आला.
माण तालुक्यातील पळसावडे येथील जानकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. जानकर यांनी नोकरी न करता आपल्या धनगर समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, या ध्येयातून त्यांनी काम सुरू केले. पहिल्यापासून छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा असणाऱ्या जानकर यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला व राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना उतरवत राजकारणात आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली. सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवल्याने राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून, भंडाऱ्याची उधळण केली. पळसावडे येथे फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत.
माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडीसह अनेक गावांमध्ये ‘रासप’च्या कार्यकर्त्यांनी आंनदोत्सव साजरा केला. ‘रासप’चे तालुकाध्यक्ष युवराज बनगर, जगन जानकर, बाळराजे वीरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पळसावडे परिसरातील टाटा पॉवर कंपनीतील कर्मचार्ऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स झळकले आहेत. (प्रतिनिधी)
जानकरांना पालकमंत्रिपद देण्याची मागणी
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर सातारा शहरामध्ये कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व फटाके वाजवून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. जानकरांना मंत्रिमंडळात घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानन्यात आले. ‘रासप’ हा महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असून, या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद देऊन सन्मान केला गेला आहे. आजपर्यंत सातारा जिल्ह्याला ओबीसी पालकमंत्री झालेला नसल्याने साताऱ्याचे पालकमंत्रिपद जानकर यांना देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जानकर यांना मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी ‘रासप’चे जिल्हा सरचिटणीस मारुती जानकर, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद माने, प्रा. खटके, डी. बी. ठोंबरे, डॉ. आशिष जरग, संदीप कोळपे, शामराव कोळपे, विजय थोरात, प्रमोद फणसे, रणजित धायगुडे, गिरीश माळवदे, शामराव कोळपे, अमर कोळपे, संदीप कोळपे, विशाल धायगुडे, महेश गायकवाड, रामदास मोरे, विक्रांत माने, अजित माने, संतोष शेलार आदींची उपस्थित होती.