रंगलेली बैलं चिंब पावसानं सुखावली !
By Admin | Published: July 11, 2014 11:16 PM2014-07-11T23:16:27+5:302014-07-11T23:16:56+5:30
वाई, महाबळेश्वरात जोर वाढला : सातारा, पाटणमध्येही संततधार
सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी बेंदूर सण साजरा होत असतानाच सर्वदूर पावसाची संततधार सुरूच होती. साताऱ्यासह महाबळेश्वर, पाटण, वाई, कोरेगाव तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र, बेंदरासाठी रंगवलेली बैलं चिंब पावसानं सुखावली.
जिल्ह्याकडे पावसाने यंदा पाठ फिरविल्याने दुष्काळाचे सावट पसरले होते. यामुळे बळिराजाही हबकला होता. दोन वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती होती. तेव्हा माण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी चारा छावण्यांमध्ये बेंदूर सण साजरा केला होता.
अनेक शेतकरी सणाची तयारी करत असतानाच जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. दुपारी तीननंतर पावसाचा जोर वाढला. वाई, महाबळेश्वरमध्येही पावसाचा जोर वाढला आहे.
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये (कंसात आजवरचा एकूण) असा : सातारा ३.३ (४१.६), कऱ्हाड ०.२ (६८.९), पाटण ३.४ (१४६.८), फलटण (००), ३८.०, माण १.० (७३.९), खटाव २.५ (७४.७), वाई ०० (२३.१), महाबळेश्वर ३९.० (४२५.९), खंडाळा ०० (३९.७). (प्रतिनिधी)