‘स्वच्छ वाहते कृष्णामाई’तर्फे चित्रकला स्पर्धा
By admin | Published: February 2, 2015 09:29 PM2015-02-02T21:29:50+5:302015-02-02T23:59:45+5:30
६ रोजी आयोजन : वीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
वाई : वाई तालुक्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेल्या ‘स्वच्छ वाहते कृष्णामाई’ अभियानातर्फे वाई तालुकास्तरीय शालेय चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा दि. ५ ते ८वी व ९ वी ते १२ अशा दोन गटांमध्ये होणार आहे. वाई तालुक्यातील २०,००० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे १,१००, ७०० व ५०० रुपयांची भेटवस्तू व गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.
दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. तसेच विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त सहभाग नोंदविणाऱ्या पहिल्या तीन शाळांना अनुक्रमे ५०००, ४००० व ३००० रुपयांची भेट व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. नदी, गाव, पाणवठा व जलस्रोत व वैयक्तिक पातळीवर नदी स्वच्छतेमध्ये आपण कसा सहभाग देऊ शकतो, हे विद्यार्थी या स्पर्धेतून व्यक्त करू शकतील, असे विषय यासाठी निवडण्यात आले आहेत. वाई तालुका मुख्याध्यापक संघाचे मुख्य नियोजक आहेत. दिशा अॅकॅडमी, वाई हे प्रायोजक तर ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहेत. माहितीसाठी अनिल सपकाळ ९४२०७७२११७, दिलीप जाधव ९९२१८३७५०७ यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)