Satara: माउलींच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक!, लोणंदनगरीत चैतन्य; चांदोबाचा लिंब येथे आज पहिले उभे रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:02 PM2024-07-08T13:02:13+5:302024-07-08T13:04:37+5:30
रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकांकडून सहकुटुंब दर्शन
लोणंद : श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी दुसऱ्या दिवशीही रविवारी लोणंदनगरीत विसावला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक लोणंदमध्ये जाऊन माउलीचरणी नतमस्तक झाले. दर्शनासाठी तब्बल चार किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, मनात माउलींच्या दर्शनाची आस असल्याने भाविक रांगेतून दर्शन घेत होते. यामुळे लोणंदनगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरीच्या पांडुरंगाला डोळे भरून पाहण्यासाठी वैष्णवांचा मेळा आळंदीहून पंढरपूरकडे निघाला आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी झाले आहेत. लोणंदमध्ये माउलींचा रविवारी दुसरा मुक्काम होता. शनिवारी रात्रभर हरिनामाचा जयघोष केला जात होता. विविध भागांतून सहभागी झालेल्या दिंड्यांतील भाविकांनी टाळ-मृदंगाचा गजरात विठ्ठलाचा धावा केला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
साधू-संत येती घरा, तोच दिवाळी दसरा
‘साधू-संत येती घरा, तोच दिवाळी दसरा’ याप्रमाणे लोणंदनगरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांना कोठेही गैरसोयीचा सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणून लोणंदसह जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटनांनी पाणी, औषधे, अन्नदान केले. प्रत्येक जण जे शक्य असेल ते देऊन वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत होता.
चांदोबाचा लिंब येथे आज पहिले उभे रिंगण..
लोणंद येथील मुक्काम आटोपून सोहळा सोमवारी दुपारी तरडगावकडे मार्गस्थ झाल्यावर सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर चांदोबाचा लिंब येथे वारीतील डोळ्याचे पारणे फेडणारा पहिला उभा रिंगण सोहळा ४ वाजेच्या सुमारास रंगणार आहे. त्यानंतर सायंकाळी पालखीचे तरडगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले जाणार आहे.