पळशी-मनकर्णवाडी रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: June 22, 2017 01:36 PM2017-06-22T13:36:52+5:302017-06-22T13:36:52+5:30
ग्रामस्थ हवालदिल : लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
आॅनलाईन लोकमत
पळशी (जि. सातारा), दि. २२ : माण तालुक्यातील पळशी ते मनकर्णवाडी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशीच झाली असून, दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पळशी ते मनकर्णवाडी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिला आहे. रस्त्यात सर्वत्र खड्डे पडले असून, रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशीच झाली आहे.
या रस्त्यावरून दुचाकीही जाऊ शकत नाही, या रस्त्याची लांबी पाच किलोमीटर असून, मनकर्णवाडी, माळवे वस्ती, जोतीचा मळा, सुतारवस्ती यांच्यासाठी पळशी गावात जाण्यासाठी हाच रस्ता आहे.
मनकर्णवाडीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बँक, सोसायटी, तलाठी कार्यालय, माध्यमिक शाळा, आठवडी बाजार आदी कामांसाठी येथील जनतेला पळशीत जावे लागते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सातारा-सोलापूर रोडवरून मोठा वळसा घालून जावे लागत असून, पळशीवरून मनकर्णवाडीला जाणारी बस दुसऱ्या रस्त्याने फिरवून न्यावी लागत असून, अडचणी येत आहेत.
त्यामुळे या रस्त्यावरून सर्व दळणवळण ठप्प झाले असून, एरवी मते द्या म्हणून जोगवा मागणारे लोकप्रतिनिधीही आता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.