पॅनला मिळेना आधार!
By admin | Published: July 1, 2017 12:35 PM2017-07-01T12:35:48+5:302017-07-01T12:35:48+5:30
अनेक ग्राहक चिंतेत : आयकर विभागाच्यावेबसाईटवर जोडण्याची प्रक्रिया होईना
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. 0१ : आयकर विभागातर्फे देण्यात आलेल्या पॅन कार्डला आधार कार्ड क्रमांक जोडण्याबाबत सोशल मिडियावरुन माहिती फिरत आहे. ३0 जून ही अखेरची तारीख असल्याचे सांगितले जात असल्याने शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी लोकांनी आयकर विभागाची वेबसाईट उघडून त्यावर पॅनकार्डला आधार कार्ड क्रमांक जोडण्याचा करण्याचा प्रयत्न केला; परंतु अनेकांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे हाच अनुभव १ जुलै रोजीही अनेकांना आला.
बोगस पॅन नेटवर्कला प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने पॅनला आधार क्रमांक जोडण्याचा निर्णय घेतला आहे, ३0 जूनच्या आत सर्व पॅन क्रमांक आधार क्रमांक जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा पॅन क्रमांक बंद होईल, पॅन बंद होण्यापासून वाचविण्यासाठी आजच जोडा, पॅनला आधार क्रमांक जोडणे अतिशय सोपे आहे, अशा सूचना सोशल मिडियाच्या माध्यमातून फिरत आहेत.
पॅनला आधार क्रमांक जोडण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, त्याचा व्हिडिओ ज्या लिंकवर आहे, तोही दाखविला जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक पॅनधारकांनी आयकर विभागाचे संकेतस्थळ उघडून त्यावर आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामध्ये जाहीरातीच जास्त पाहायला मिळाल्या. जो अर्ज दिला आहे, त्यात माहिती भरण्यासाठी कर्सरही घेतला जात नाही, हे लक्षात आल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला.
दरम्यान, आधार कार्ड क्रमांक पॅनकार्डशी जोडला गेला नसल्याने पॅनकार्ड बंद पडण्याच्या भीतीने अनेकांची गाळण उडाली. ज्यांनी पॅनकार्डशी आधारकार्ड जोडले नाही, त्यांचे १ जुलैनंतर पॅनकार्ड बंद होणार, अशी चर्चा पॅनधारकांमध्ये सध्या सुरु आहे.
पुणे कार्यालयाशी संपर्क साधा
पॅनकार्ड आधारकार्डशी जोडण्याबाबत येथील आयकर विभागाशी संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्याने पुणे येथील वरिष्ठांकडून माहिती घ्या, आम्ही तुम्हाला ती देऊ शकत नाही, असे सांगितले.
आयकर विवरण पत्र भरण्यासाठी यापुढे आधार आणि पॅन क्रमांकाच्या लिंकची गरज भासणार आहे. तांत्रिक कारणांअभावी ३० जूनच्या आत ही लिंक जोडता आली नाही तरी नागरिकांनी चिंता करू नये. ही लिंक कधीही जोडली तरी चालू शकते.
- सुरेशचंद्र कटारिया,
चार्टेड अकाउंटट