पंचायत समिती सदस्याला मारहाण
By admin | Published: May 21, 2014 01:00 AM2014-05-21T01:00:28+5:302014-05-21T17:37:26+5:30
कार पायाला घासल्याचे निमित्त : पोलीस ठाण्यासमोरील राडा ‘सीसीटीव्ही’त कैद
सातारा : सातारा पंचायत समितीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांची एका लग्न समारंभात वादावादी झाली. याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या पंचायत समिती सदस्य आणि त्यांचा प्रतिस्पर्धी यांच्यात ठाण्यासमोरच पुन्हा मारामारी झाली. हा राडा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ‘सीसीटीव्ही’त कैद झाला. ही खळबळजनक घटना आज, मंगळवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. सातारा पंचायत समितीच्या निवडणुकीत राहुल शिंदे हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे रणजित माने त्यांच्याविरोधात उभे राहिले होते. या निवडणुकीत शिंदे विजयी झाले होते. त्यामुळे या दोघांमध्ये पूर्वीपासूनच राजकीय वाद आहेत. दरम्यान, आज पाटखळ माथ्यावरील एका लग्न समारंभात शिंदे आणि माने यांना निमंत्रण होते. या लग्न समारंभाला राहुल शिंदे पहिल्यांदा पोहोचले होते. लग्नाच्या मुहूर्ताला अर्धा तास बाकी होता. त्यामुळे ते रस्त्याच्या शेजारी कार्यकर्त्यांशी गप्पा मारत उभे राहिले होते. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रणजित माने कारमधून लग्न समारंभासाठी येत होते. त्यावेळी कारचे फूटरेस्ट शिंदे यांच्या पायाला लागले. त्यामुळे दोघांची बाचाबाची झाली. हा वाद तेथे उपस्थित असणार्या कार्यकर्त्यांनी सोडविला. मात्र, लग्नसमारंभ पार पडल्यानंतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी रणजित माने यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्याला जखम झाली. अशा अवस्थेत ते कुटुुंबासह शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. त्यांच्यापाठोपाठ राहुल शिंदेही आले. त्यावेळी रणजित माने यांचा भाऊ अजित माने यांनी धावत जाऊन शिंदे यांच्या शर्टाची कॉलर पकडली आणि त्यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार सुरू असताना तेथे शिंदे यांचे समर्थक आले. त्यांनीही अजित माने यांना मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यासमोरच दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस ठाण्यातून धावत येऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटकले आणि राहुल शिंदे आणि रणजित माने यांच्यासह अन्य काहीजणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)