पंचायत समितीमध्ये टेबलवर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:41+5:302021-04-15T04:38:41+5:30
वाई : वाई पंचायत समितीत टेबलवर वजन ठेवल्याशिवाय साधा कागदसुद्धा हलत नाही. अशी परिस्थिती झाली आहे. सत्ताधारी गटाच्या गांधारीपणाच्या ...
वाई : वाई पंचायत समितीत टेबलवर वजन ठेवल्याशिवाय साधा कागदसुद्धा हलत नाही. अशी परिस्थिती झाली आहे. सत्ताधारी गटाच्या गांधारीपणाच्या भूमिकेमुळे वाई पंचायत समितीत अधिकारी ठेकेदारांकडून पैसे घेत आहेत. राजकीय वरदहस्तामुळे पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, ऋतुजा शिंदे यांनी केला.
वाई पंचायत समितीची मासिक सभा सभापती संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली किसनवीर सभागृहात पार पडली. यावेळी विषय समितीवरील विषयावर चर्चा झाल्यानंतर पंचायत समिती सदस्या ऋतुजा शिंदे, दीपक ननावरे यांनी वाईचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर हे विविध विकास कामांचा धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून थेट पैसे मागत असल्याची माहिती सभागृहाला करून दिली. बावधन गणातील एक ग्रामस्थ आमच्याकडे आला तेव्हा त्यांनी सांगितले की एका धनादेशावर सही करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी थेट पैसे मागितले. यावर संबंधित ठेकेदाराने आमच्याशी फोनवर संपर्क साधून आम्ही तुम्हांला असले पैसे देण्यासाठी भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी मते दिली होती का? असे विचारताच यावर आम्ही निरुत्तर झालो. वाई पंचायत समितीमध्ये खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे, अशा तक्रारी आजवर कानावर येत होत्या. पण तो इतका फोफावला असेल असे वाटत नव्हते. अधिकाऱ्यामध्ये थेट पैसे मागण्याचे धाडस तेव्हाच करतो, जेव्हा त्याला राजकीय वरदहस्त मिळतो. वाई पंचायत समितीमध्ये जे काही सुरू आहे, त्याला सर्व सत्ताधारी गट जबाबदार आहे. सत्ताधारी-अधिकारी यांच्या मिलीभगतमधूनच हा भ्रष्टाचार सुरू असल्याचा घणाघात ननावरे यांनी केला. पदाधिकाऱ्यांचे हात काळे झाल्याशिवाय अधिकाऱ्यांची मुजोरी वाढू शकत नाही, असा खळबळजनक आरोप करून ननावरे यांनी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
ऋतुजा शिंदे यांनी वाई पंचायत समितीमधील भ्रष्ट कामगिरीची माहिती दिली. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वाई पंचायत समिती काय कारवाई करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या भ्रष्टाचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांनी याबाबत माहिती घेऊन पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.
यावेळी उपसभापती विक्रांत डोंगरे यांच्यासह सर्व सदस्य, सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
कोट : माझ्यावर केलेले आरोप तथ्यहीन
पंचायत समितीमध्ये झालेल्या मासिक सभेत सदस्य दीपक ननावरे, ऋतुजा शिंदे यांनी सभागृहात कोणाचेही नाव न घेता अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. वास्तविक पाहता मार्च अखेरची सर्व बिले अदा केली असून अशा प्रकारची कोणतीही मागणी केल्याची लेखी तक्रार आली नाही. तशी कोणी तक्रार केली असल्यास त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करू
उदयकुमार कुसुरकर (गटविकास अधिकारी, वाई पंचायत समिती )