पंढरीची वारी : जेवणावळीच्या तयारीत गुंतली तरुण मंडळे !

By admin | Published: June 24, 2017 03:10 PM2017-06-24T15:10:08+5:302017-06-24T15:10:08+5:30

काळानुसार बदलला मेनू ; आता प्रतीक्षा वैष्णव भक्तांची

Pandhari Vary: The young circles engaged in the meal! | पंढरीची वारी : जेवणावळीच्या तयारीत गुंतली तरुण मंडळे !

पंढरीची वारी : जेवणावळीच्या तयारीत गुंतली तरुण मंडळे !

Next

आॅनलाईन लोकमत

मलटण ( जि. सातारा) , दि. २४ : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी प्रत्येक मंडळांनी एखादी दिंडी कायमची बांधून घेतलेली असते. ती दिंडी न चुकता दरवर्षी त्याच ठिकाणी उतरते. या अन्नदानासाठी तरुण मंडळांची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. जसजसा समाज बदलत गेला, तसतशी या जेवणावळ्या आणि त्यातील मेनू ही बदलत गेले हे फलटणमध्ये दिसून येत आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती, टाळ, मृदुंगाची गरज करत येणाऱ्या वैष्णव भक्तांची.

वैष्णव भक्तांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक फलटणनगरी नेहमीच सज्ज असते. श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा फलटणकर नागरिकांसाठी दिवाळीचा सणच असतो; आलेल्या प्रत्येक वारकऱ्याचे स्वागत करण्यास मनोभावे फलटणकर सज्ज असतात. गेल्या सातशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा जोपासली जात आहे. पंढरपूर वारीमधील मध्य ठिकाण म्हणूनसुद्धा फलटणनगरीकडे पाहिले जाते. सातारा जिल्हा तसा आर्थिकदृष्ट्या सुगम आणि सुजलाम्-सुफलाम् आहे. त्यामुळे वारकऱ्याची आणि प्रत्येक विठ्ठल भक्तांची सर्व प्रकारची सेवा करण्यास येथील व्यावसायिक, नोकरदार, राजकीय नेतेमंडळी आणि गावोगावची तरुण मंडळे सज्ज असतात.

पूर्वी वारकऱ्यांना झुणका-भाकरी तसेच मिचीर्चा ठेचा हमखास असायचा. गव्हाची खमंग लापसी मन तृप्त करायची. सांभर, भात-वरण, भाजी पुरी ही अलीकडच्या काळात पत्रावळीवर दिसायची. गेल्या चार-पाच वर्षांत यात खूपच बदल होत गेला. वारकरी लोकांना परिपूर्ण आहार कसा देता येईल, याकडे मंडळांनी आजच्या पिढीच्या तरुणांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. या बदलत्या जनरेशनमध्ये मेनूही बदलले. गुलाबजामुन, पनीर, लोणचे, पापड, मटकी, चपाती, भात, कोशिंबिर, पुलाव, खिचडी, भरलेलं वांगं आणि बरंच काही अशी यादी वाढतच गेली. चहा-पोह्यांचा नाश्ता तर असतोच; पण सरबत, कोकम, आईस्क्रीम असे वेगळे मेनूही दिसतात.

पूर्वी जमिनीवर असेल त्या जागेत बसून पानांच्या पत्रावळीत पंगती वाढल्या जायच्या; आता टेबलखुर्ची आली. मलटणमधील काही मंडळांनी तर बुफे पद्धतही ठेवली आहे. पाण्याचे फिल्टर, जार ही उपलब्ध असतात. एकूणच हा सोहळा दिवसेंदिवस वाढत गेला आणि कालातंराने जेवणावळीही बदलत गेली. त्यातील मेनू बदलले; पण वैष्णवांची भक्ती कायम तशीच आहे, चिरंतन.


फलटण, मलटण सज्ज...



फलटण तालुक्यातील वडजल, सुरवडी, खराडेवाडी या छोट्या गावांमधूनही जेवणावळीचे मोठे कार्यक्रम ठेवले जातात. मलटण-फलटण तर केव्हाच सज्ज आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे, टाळ मृदुंगाचा गजर करत येणाऱ्या वैष्णव भक्तांची.


अन्नदानाची आमची ही परंपरा गेल्या २० वर्षांपासून अविरत सुरू आहे. आता आमची पुढची पिढीही मनोभावे ही परंपरा जपत आहे.
- अशोक गुंजवटे,
सगुणामातानगर, मलटण



- मुंबईवरून दरवर्षी येऊन सलग दोन दिवस माउली भक्तांसाठी जेवणाची सेवा आम्ही करतो. यातून मिळणारा आनंद वर्षभर आम्हाला ऊर्जा देत असतो.
- शिवाजी दडस,
उद्योजक, मुंबई

Web Title: Pandhari Vary: The young circles engaged in the meal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.