चांदोबाचा लिंबमध्ये पहिले उभे रिंगण उत्साहात; भाविकांच्या डोळ्यांचे फिटले पारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:49 PM2023-06-20T21:49:24+5:302023-06-20T21:50:01+5:30
हरिनामाच्या गजरात रंगला माऊलींचा उभे रिंगण सोहळा, अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर लोणंदकरांचा निरोप घेत पालखी सोहळा दुपारी दीडच्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला.
सचिन गायकवाड
तरडगाव : अश्व धावे अश्वामागे। वैष्णव उभे रिंगणी। टाळ, मृदुंगा संगे। गेले रिंगण रुगुनी॥ या काव्य रचनेप्रमाणे वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या नेत्रदीपक दौडीला प्रारंभ झाला. कमालीची उत्कंठा, गगनभेदी टाळ मृदुंगाचा गजर, अखंड सुरू असलेला माऊलींचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात माऊलींच्या तसेच स्वाराच्या अश्वांनी मंगळवारी नेत्रदीपक दौड घेत चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण पूर्ण केले. श्वास रोखून ठेवलेल्या उपस्थित असंख्य भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा वारीतील पहिला उभा रिंगण सोहळा लाखो भाविकांनी याचि देही याचि डोळा पाहिला.
अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर लोणंदकरांचा निरोप घेत पालखी सोहळा दुपारी दीडच्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला. साऱ्यांनाच वारीतील पहिल्या उभ्या रिंगणाची आस लागते. हा सोहळा खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश करताना सरदेचा ओढा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
लोणंद - तरडगाव हे कमी अंतर असल्याने वारकरी सहजतेने उत्साहात टाळ मृदुंगाचा गजर करीत या मार्गात पुढे सरसावत होते. दरम्यान, चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण होणार असल्याने ते पाहण्यासाठी विविध गावांतून भाविकांची पावले ही आपोआप रिंगणस्थळी पडत होती. हा सोहळा पाहता यावा म्हणून महिला भाविक आधीच गर्दी करून बसल्या होत्या. सुरुवातीला माऊलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना चांदोबाचा लिंब मंदिर येथे आला. त्यानंतर पालखी रथ हा मंदिरासमोर आल्यावर कमालीची उत्सुकता ताणली गेली. यावेळी वैष्णवांच्या माऊली... माऊली या जयघोषाने सारा आसमंत भक्तिरसात चिंब झाला होता. यावेळी साऱ्यांच्या नजरा धावणाऱ्या दोन्ही अश्व यांच्याकडे होत्या. चोपदरांनी रिंगणस्थळी रिंगण लावून घेतल्यावर उत्साहाला उधाण आले. त्यांनी हात उंचावून इशारा करताच दुतर्फा वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा व स्वाराचा अश्व एकमेकांशी स्पर्धा करीत एकापाठोपाठ धावत सुटले.
रथापुढील व मागील दिंड्यांपर्यंत धावत जाऊन पुन्हा माघारी फिरून असंख्य डोळ्यांचे पारणे फेडणारी दौड घेत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. यावेळी अश्वांना रथापुढे प्रसाद भरविण्यात आला. वर्षातून एकदाच पाहावयास मिळणारा हा सोहळा प्रत्येकाने आपल्या डोळ्यांत साठवत माउलींचा गजर करीत अश्वाच्या टापांची माती ललाटी लावत धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर महिलांसह भाविकांनी फुगड्या, फेर धरत पारंपरिक खेळ करीत मनसोक्त आनंद लुटला.
हरिनामाच्या गजरात रंगला माऊलींचा तरडगाव येथील उभे रिंगण सोहळा (व्हिडिओ: प्रशांत रणवरे, जिंती) #pandharpurwaripic.twitter.com/q1t1sRoJWl
— Lokmat (@lokmat) June 20, 2023
अश्वांना स्पर्श करण्यासाठी झुंबड
अश्वांचा स्पर्श व पालखीतील माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. देहभान विसरून साऱ्यांचा ग्यानबा... तुकारामाचा अखंड जयघोष सुरू होता. परिसरात प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केल्याचे दिसले. त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने डोक्यावर तुळशी वृंदावन, भगवी पताका घेत तरडगाव मुक्कामासाठी वारकरी मार्गस्थ झाले.