उंब्रज परिसरातील भाविकांची पंढरीची वारी
By Admin | Published: June 27, 2017 01:14 PM2017-06-27T13:14:27+5:302017-06-27T13:14:27+5:30
सोहळ्यात ४०० जण सहभागी : संत सखूंच्या पादुका घेऊन मार्गस्थ
आॅनलाईन लोकमत
उंब्रज (जि. सातारा), दि. २७ : संत सखू यांच्या पादुका रथात घेऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या उंब्रज व परिसरातील वारकरी मंडळींनी उंब्रज ते पंढरपूर अशा पायी वारीस सुरुवात केली आहे. यामध्ये सुमारे ४०० भाविक सहभागी झाले आहेत.
दि. २४ रोजी कऱ्हाड येथील संत सखू मंदिरातून पादुका रथातून उंब्रजला भैरवनाथ मंदिरात मुक्कामी आणण्यात आल्या. कृष्णा नदीत पादुकांना विधिवत स्नान घालण्यात आले. यानंतर दुपारी मृदुंग व टाळाच्या गजरात रथातून पालखी सोहळ्याने उंब्रजमधून प्रस्थान केले. सायंकाळी अंतवडी येथे पालखी सोहळा मुक्कामी होता. त्यानंतर रायगाव, म्हासुर्णे, चितळी, मायणी, विखळेफाटा, तसरवाडी, झरे, शेनवडी, दिघंची, शेरेवाडी, चिकमहूद, गाडीर्फाटा, वाखरी या ठिकाणी मुक्काम करून हा पालखी सोहळा पायी प्रवास आणि अखंड हरी नामाचा गजर करत सोमवार, दि. ३ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहचणार आहे. दि.४ जुलै रोजीला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन बुधवार, दि. ५ जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू राहणार आहे.
उंब्रजच्या पायी वारी सोहळ्यास पंरपंरा होती. पण कारणास्तव ती काही काळ खंडित झाली होती. वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती हभप विठ्ठल महाराज यांच्या प्रेरणेतून सात वर्षांपूवी पुन्हा नव्या जोमाने उंब्रज ते पंढरपूर ही वारी सुरू झाली आहे. या सोहळ्यामध्ये हभप नामदेव आप्पा शामगावकर, इनामदार सर, पांडुरंग माळी मायणी, पांडुरंग महाराज म्हासुर्णेकर, रंगराव काळे, श्री दुगामार्ता भजनी मंडळ, संजय महाराज हे किर्तन व भजनाची सेवा करणार आहेत.
या दिंडीला सात वर्षांपूर्वी सुरुवात झाली तेव्हा काही मोजकेच लोक या वारीत सहभागी होते. पण, कालांतराने सहभाग वाढत गेला. यावर्षी सुमारे ४०० च्या आसपास पुरुष व महिला, युवक, युवती या दिंडीत सहभागी झाले आहेत. अनेक सेवासुविधा या पायी दिंडीत पुरवल्या आहेत.
वारकऱ्यांच्या साहित्यासाठी विशेष वाहनव्यवस्था, शुद्ध व मुबलक पाणी, आरोग्य सुविधा पुरवली जाणार आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी लागणारे कागद, गॅस सिलेंडर व उपयोगी वस्तू देऊन काहीजण वारीची सेवा बजावत असल्याचे दिंडी चालक, भैवनाथ मंडळाचे हभप रंगराव काळे यांनी सांगितले.
दिंडी सोहळ्यामध्ये भक्तीबरोबरच अनेक सामाजिक प्रबोधनपर उपक्रम राबविले जातात. लेक वाचवा, वृक्ष लागवडीचे महत्त्व, व्यसनमुक्ती, पर्यावरणाचे महत्त्व आध्यात्मिक प्रकारे सांगितले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी विविध मान्यवरांचे किर्तन व भजनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे दिंडी सचिव रामचंद्र घाडगे यांनी सांगितले.
या पायी पालखी सोहळ्याच्या मार्गावर विसाव्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची तयारी काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. उंब्रज रोटरी क्लबचे अध्यक्ष सुधाकर जाधव, सचिव राजीव रावळ, सत्वशिल पाटील, दिलीपराज चव्हाण, फोटोग्राफर संघटनेचे रवींद्र साळुंखे, अमोल जाधव, रणजित पाटील, प्रदिप माळी आदी यासाठी प्रयत्नशील आहेत.
दिंडी मार्गावर अनेक भाविकांकडून सकाळच्या व रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच यंदा प्रथमच २ लाख रुपये खर्च करून उंब्रजकरांनी पादुकांसाठी रथ तयार केला आहे.
- राहुल जाधव, अध्यक्ष