ग्रेड सेपरेटरचा फलक आपसूकच खाली पडला; उदयनराजे भोसले समर्थकांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 08:49 AM2021-01-10T08:49:08+5:302021-01-10T08:49:24+5:30
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अचानक उद्घाटन केलेल्या ग्रेडसेपरेटरचा फलक शुक्रवारी रात्री अज्ञाताने फाडल्याचा समज करत कार्यकर्त्यांनी सकाळी निषेध केला. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा फलक अपसूकच खाली पडला असल्याचे निदर्शनास आले.
पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी उदयनराजे भोसले यांनी अचाकन केले. त्यानंतर हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी रात्री वायसी कॉलेजसमोरील भुयारी मार्गाचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक अज्ञाताने फाडून खाली फेकून दिला. अशी चर्चा शहरात सुरू झाली. त्यानंतर उदयनराजे भोसले समर्थकांनी शनिवारी सकाळी पोवई नाक्यावर धाव घेतली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जलद कृतीदलाच्या दोन तुकड्यांसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा पोवई नाक्यावर पोहोचला.
या घटनेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणा देत संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. उदयनराजे भोसले यांनी घटनास्थळी न येता कार्यकर्त्यांना फोनवर शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यापर्यंत मूक मोर्चा काढला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार इतर कोणी केला नसून, आपसूकच फलक खाली पडला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा आहे.