कुत्र्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:34 AM2021-01-17T04:34:08+5:302021-01-17T04:34:08+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून, पर्यटकांसह नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शहराच्या मुख्य ...
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून, पर्यटकांसह नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शहराच्या मुख्य चौकांसह गल्लीबोळांमध्ये कुत्र्यांच्या टोळक्यामुळे रस्त्याने चालणेही मुश्कील बनले आहे.
धोकादायक प्रवास
सातारा : सातारा शहरातील अनेक पालक विद्यार्थ्यांना रिक्षातून पाठवत असतात. काही रिक्षाचालक एका रिक्षात सुमारे पंधरा ते वीस मुलांना बसवत आहेत. काही वेळेला मुलांना उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मोगरा फुलांना मागणी
सातारा : सध्या मोगऱ्याच्या झाडांना चांगलाच बहर आला आहे. देवपूजा व गजऱ्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बसस्थानक व बाजारपेठ परिसरात मोगरा फुलांपासून तयार केलेल्या गजऱ्यांच्या खरेदीसाठी महिला वर्गातून गर्दी केली जात आहे.
गतिरोधकाची मागणी
सातारा : गोडोली येथे वाहनांची वर्दळ जास्त प्रमाणात असल्याने याठिकाणी गतिरोधकाची मागणी नागरिकांतून होत आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालय, वसाहती मोठ्या प्रमाणावर असून, आबालवृद्धांची वर्दळ कायम असल्याने ही मागणी होत आहे.
वर्ये पुलावर कचरा
सातारा : वर्ये, ता. सातारा येथील वेण्णा नदीच्या पुलाजवळ नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा फेकत आहेत. हा कचरा रस्त्यावर येत आहे. या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य साठले आहे.
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
सातारा : करंजे येथील महानुभाव मठासमोरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर शिळे अन्न व कोंबड्यांचे पंख टाकले जात असून यावर मोकाट कुत्री डल्ला मारत आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघातही होत आहेत.