टँकरमुळे फरशी फुटल्याने तलवार काढून माजवली दहशत, साताऱ्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 01:36 PM2022-04-22T13:36:11+5:302022-04-22T13:39:52+5:30
संशयितांनी काही जणांना मारहाण करत तलवार काढून दहशत निर्माण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकीही दिली.
सातारा : सातारा शहराजवळील सैदापूर येथे पाण्याच्या टँकरमुळे फरशी फुटली. यामुळे संतप्त संशयितांनी काहींना मारहाण करत तलावर काढून दहशत माजवली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संशयित सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी साईल सुनील गवरे (वय १९, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैदापूर, ता. सातारा) याने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार तुषार सोमनाथ केदार आणि सोमनाथ केदार (दोघेही रा. स्वामी विवेकानंद नगर) यांच्यासह इतर चार साथीदारांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
सैदापूर येथे बुधवारी (दि.२०) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. पाणी टँकरमुळे फरशी तुटली. त्यामुळे संशयितांनी काही जणांना मारहाण करत तलवार काढून दहशत निर्माण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत तक्रार दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार माने हे तपास करीत आहेत.