पाणीदार खासदार : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:29 AM2021-02-19T04:29:35+5:302021-02-19T04:29:35+5:30

काही माणसे स्वतःसाठी जगून आनंद मिळविताना दिसतात, तर काही माणसे दुसऱ्यांसाठी जगून त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद घेताना दिसतात. मानवी ...

Panidar MP: Ranjit Singh Naik-Nimbalkar | पाणीदार खासदार : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

पाणीदार खासदार : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

googlenewsNext

काही माणसे स्वतःसाठी जगून आनंद मिळविताना दिसतात, तर काही माणसे दुसऱ्यांसाठी जगून त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद घेताना दिसतात. मानवी स्वभावाचे हे दोन पैलू आहेत. मात्र दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद घेणारे फार कमी लोक असतात. त्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासारख्या धाडसी व्यक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. घरातील राजकीय व देशसेवेचे असलेले वातावरण जपत असताना, सामाजिक, राजकीय व उद्योगक्षेत्रात नाव कमविण्याचे आव्हान रणजितसिंहांनी चांगल्याप्रकारे पेलले आहे. फलटण तालुका दुष्काळी असतानाही आई-वडिलांच्या प्रेरणेने बाहेर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी न जाता आपल्या मातृभूमीतच वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी स्वराज दूध प्रकल्प स्थापना करून रणजितसिंह ऊर्फ दादांनी उद्योगधंद्याचा श्रीगणेशा केला. या व्यवसायाचा अनुभव नसतानाही अडचणी झेलत त्यांनी हा प्रकल्प एक-दोन वर्षांतच यशस्वी करीत शेकडो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला.

स्वभावात तडजोड हा शब्दकोश नसल्याने, जे काम हाती घेतले ते तडीस नेले. पाचशे लिटरपासून सुरू केलेले दूधसंकलन आठ लाखांच्या पुढे नेले होते. हजारो जणांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. स्वराज दूध प्रकल्पाबरोबरच स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचीही त्यांनी स्थापना करून ही पतसंस्था प्रगतीपथावर नेली आहे.

अनेक नावाजलेल्या पतसंस्था व सहकारक्षेत्र धोक्यात आले असतानाही स्वराज पतसंस्थेची गरुडझेप कौतुकास्पद आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. आठ वर्षांपूर्वी फलटण तालुक्यात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे जनावरांबरोबरच माणसानाही जीवन जगणे असह्य झाले होते. अशा परिस्थितीत बंद पडलेली ढवळ प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना स्वखर्चाने सुरू करून दादांनी दुष्काळी ढवळ, उपळवे, ताथवडा, वाखरी भागात पाणी दिले. तसेच शासनाच्या परवानगीची वाट न बघता स्वखर्चाने ढवळपाटी येथे चारा छावणी सुरू केली होती. येथील जनावरांना स्वखर्चातून शासनाच्या नियमापेक्षा जास्त चारा दिला. दुष्काळी परिस्थितीत त्यांनी केलेले काम सर्वत्र वाखाणले गेले. दुष्काळी परिस्थितीत संपूर्ण स्वराज उद्योग समूहाची यंत्रणा वापरून त्यांनी दुष्काळी जनतेचा दुवा घेतला.

दुष्काळी जनतेला पाण्याच्या टाक्या, पाण्याचे टँकर मोफत पुरविले. सीतामाई डोंगरावर फलटण तालुक्यातील जनतेला जाण्यासाठी दहीवडी मार्गे जावे लागे. त्यामुळे उपळवे ते कुळजाई या घाटरस्त्याचे काम मंजूर करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते त्याचे भूमिपूजनही करून घेतले. यामुळे फलटण माण तालुके आणखी जवळ येऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचा दादांनी प्रयत्न केला. तालुक्यातील भूमिपुत्रांना औद्योगिक वसाहतीमधील कमिन्स कंपनीत रोजगार मिळत नसल्याने, त्यांनी मोठा संघर्ष करीत नाईकबोमवाडीसारख्या दुष्काळी व डोंगराळ भागात दुसरी औद्योगिक वसाहत मंजूर करून घेतली. या औद्योगिक वसाहतीसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःची पाचशे एकर जागा मोफत दिली आहे. खऱ्याअर्थाने दुष्काळी भागात रोजगार देण्यासाठी व दुष्काळी जनतेच्या चेहर्‍यावर हास्य फुलण्यासाठी स्वतः कोट्यवधी रुपयांची झळ सोसून मोफत पाचशे एकर जागा देणारा दुसरा अवलिया दादांना म्हटल्यास योग्य ठरणार आहे. कमिन्समध्येही स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन करून कंपनीला, स्थानिकांना नोकरीत घेण्यास भाग पाडले आहे.

वडिलांप्रमाणे त्यांनी पाणीप्रश्नासाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. जनावरांचा चारा, पाणीप्रश्न सोडविण्याबाबतही उठाव केला आहे. पाणीप्रश्न सोडवणुकीला त्यांनी खासदारकीच्या काळात प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा व बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने दुष्काळी उपळवे या डोंगराळ भागात लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखाना उभारणीचे अवघड काम त्यांनी पूर्णत्वास नेले. खडतर परिस्थितीत डोंगरात कारखाना उभारणीचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. डोंगरात कोठे कारखाना असतो का? असे म्हणाऱ्यांना रणजितसिंहांनी कृतीतून उत्तर दिल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथम गळीत हंगामाच्या वेळी काढले होते. यातच दादांचे कर्तृत्व सिध्द होते. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची होणारी फरफट थांबली असून तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाल्याचे बोलले जाते. महाराष्ट्राचे माजी मृख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करून दादांना ताकद दिली होती. ही संधी अल्पकाळ मिळाली असली तरी, कमी संधीचा वेळेचा पुरेपूर उपयोग करून दादांनी अनेक दिवस रखडलेल्या निरा देवघरसाठी १३९ कोटी रुपयांचा निधी आणून दाखविला. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. या सत्तापरिवर्तनाच्या काळात भाजपकडूनही अनेक कामे दादांनी मंजूर करून आणली.

दादांचे कार्य आणि कर्तृत्व पाहून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह यांना भाजपमध्ये येण्याची गळ घातली. त्यांचा भाजप प्रवेश करून घेतला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली. भाजपने दिलेली उमेदवारी आणि ताकत याचा पुरेपूर वापर करीत रणजित नाईक-निंबाळकर यांनी रणनीती आखत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकविला.

ज्या मतदार संघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले, त्या माढा लोकसभा मतदार संघाला खिंडार पाडणे सोपे नव्हते. मात्र भाजपच्या नेतेमंडळींनी दिलेली ताकत, प्राचारात वापरलेली वेगळी रणनीती, कार्यकर्त्यांची मेहनत या जोरावर दादांनी या मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळविला.

खासदार होताच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांचे वडिलांचे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर व फलटणकर जनतेचे अनेक वर्षांपासून असलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण केले. लोणंद ते फलटण या रेल्वे मार्गावर रेल्वेगाडी सुरू केली. बारामतीला जाणारे नीरा-देवघरचे पाणी अडवून ते जादा पाणी वळविले. मतदारसंघातील प्रश्न लोकसभेत मांडले. प्रलंबित फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांना चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला असून मतदार संघात जनता दरबार सुरू केले आहेत.

मतदार संघातील दुष्काळी तालुक्यांचा दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्याचा त्यांनी संकल्प करून पाणी प्रश्नांची चळवळ सुरू केली आहे. केंद्राकडे पाणीप्रश्नाबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दादांमधील कर्तृत्व आणि जनतेच्या प्रश्नांची तळमळ ओळखून केंद्र सरकारच्या अनेक समित्यांवर रणजितसिंह यांना संधी दिली आहे.

स्वराज इंडिया अ‍ॅग्रोच्या लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याच्या माध्यमातून डिस्टिलरीचे काम पूर्णत्वास गेले असून यातून तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. या यशस्वी घोडदौडीमुळे स्वराज अ‍ॅग्रोला महाराष्ट्र शासनाच्यावतीने अल्ट्रा मेगा प्रोजेक्टचा दर्जा प्राप्त झाल्याने दादांच्या कर्तृत्वाची छाप राज्यभर दिसून आली आहे. वडील माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा राजकीय वारसा जपत मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न ते सतत करीत आहेत. वडील हिंदुरावांप्रमाणे कार्यकर्त्यांना जपण्याचे व त्यांना पाठबळ देण्याचे काम दादांकडून सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी यापूर्वी रणजितदादा मोटार वाहतूक संस्थेच्या माध्यमातून दुधाचे टँकर मोफत दिले आहेत. कारखान्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉल्या मोठ्या संख्येने दिल्या असून हजारो कार्यकर्त्यांना स्वतःच्या नावावर कर्ज काढून मोफत ट्रॅक्टर देण्याची प्रक्रिया केली आहे. राजकीय, सामाजिक, उद्योग, सहकार व्यवसायात काम करीत सामाजिक बांधिलकी जपत फलटण तालुक्यातील हजारो महिलांना तुळजापूर, कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी मोफत नेत असतात. अनेक मानअपमान सहन करीत दुसऱ्यांसाठी स्वतःची झोळी रिक्त करीत, प्रसिध्दीपासून चार हात दूर राहण्याचे व कोणताही गवगवा न करण्याचे कसब दादांनी वडील हिंदुरावांप्रमाणे जपले आहे. दादांना त्यांच्या जीवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन, बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर व पत्नी जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांची मोलाची साथ मिळत आहे.

- नसीर शिकलगार, फलटण.

Web Title: Panidar MP: Ranjit Singh Naik-Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.