‘मोक्का-तडीपार’चा नवा ‘देशमुखी पॅटर्न’ राजकीय दबाव झुगारणार : पंकज देशमुख यांनी स्वीकारला पद्भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:32 PM2018-08-01T22:32:14+5:302018-08-01T22:35:29+5:30
मोक्का, तडीपारीच्या कारवाया झालेल्या गुन्हेगारांच्या बाबतीत यापुढेही अशीच कडक भूमिका घेतली जाईल. तसेच ज्यांच्यावर कारवाई झाली आहे,
सातारा : मोक्का, तडीपारीच्या कारवाया झालेल्या गुन्हेगारांच्या बाबतीत यापुढेही अशीच कडक भूमिका घेतली जाईल. तसेच ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, ती प्रकरणेही शेवटाला नेण्याचाच प्रयत्न राहणार आहे. गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,’ असा स्पष्ट इशारा नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला.
संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर पंकज देशमुख यांनी बुधवारी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक गजानन राजमाने, राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते.
यावेळी पंकज देशमुख म्हणाले, ‘काम करत असताना राजकीय स्वरुपाचा दबाव टाकला जात असतो. मात्र, जनतेच्या दृष्टीने शांतता आणि कायदा अबाधित राहिला पाहिजे, यासाठी कोणत्याही स्वरुपाचा दबाव सहन करणार नाहीर. अशा दबावाला बळी न पडता कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहणार आहे. सातारा जिल्हा तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.’
पोलीस कर्मचाºयांच्या वसाहतीचा महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत सातारा वेल्फेअर फंडाकडून माहिती घेतली नाही. मात्र, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डच्या आर्किटेक्चरकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच टेंडर प्रक्रिया झाली. त्यामुळे माझ्या स्तरावर असलेला पाठपुरावा करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, अधीक्षक पंकज देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सातारा जिल्ह्यातील तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली.
सातारकरांचे मन मोठे....
संदीप पाटील यांनी केलेल्या कामामुळे सातारकरांनी त्यांची बदली रद्द व्हावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. एखाद्या अधिकाºयाने केलेल्या कामाची पोचपावती नागरिकांनी अशा प्रकारे देणे हे कौतुकास्पद आहे. सातारकरांचे मन खूप मोठे आहे, त्यामुळे काम करताना सकारात्मक कामाचे दडपण आहे.
सामान्यांशी संवाद ठेवणार...
पोलीस प्रशासन आणि जनतेमध्ये संवाद असला पाहिजे. दोघांमध्ये सुसंवाद असेल तर अनेक प्रश्न सुटत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, संघटन आणि तळागाळातील सर्वसामान्य माणसासोबत संवाद ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.