"पंकजा मुंडेंचा भविष्यकाळ उज्ज्वल"; उदयनराजेंनी भेट दिली तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 06:27 PM2023-09-06T18:27:30+5:302023-09-06T18:34:49+5:30
उदयनराजे यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी, उदयराजेंनी पंकजा मुडेंना तलवार भेट दिली.
सातारा - भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. त्यातच, पंकजांची यात्रा आज खासदार उदयनराजेंच्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात होता. या दौऱ्यात शिखर शिंगणापूर येथे उदयनराजे यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी, उदयराजेंनी पंकजा मुडेंना तलवार भेट दिली.
पंकजा मुंडे यांची राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू असून आज फलटण शहरामध्ये यात्रेचे आगमन होताच क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांचा ताफा थांबतात कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीभोवती गर्दी केली. येथील दौऱ्यानंतर पंकजा यांनी शिखर शिंगणापूर येथे जाऊन शिवलिंगांची पूजा केली. यावेळी, स्वत: उदयनराजे भोसले त्यांच्यासमवेत पुजेला बसले होते. तत्पूर्वी पंकजा यांचे स्वागत करताना उदयनराजेंनी तलवार भेट देत पंकजांचं कौतुक केलं.
शिखर शिंगणापूर येथे आमचे मोठे बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासमवेत आज श्री शंभू महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने केलेल्या स्वागताने भारावून गेले. आमदार माधुरीताई मिसाळ हया देखील यावेळी सोबत होत्या.@Chh_Udayanraje@madhurimisal… pic.twitter.com/3Dqnv5GM3g
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 6, 2023
पंकजा यांनी स्वतःसह समाजाचं रक्षण करावं म्हणून मी त्यांना तलवार भेट दिली आहे. मी जेव्हा पंकजा मुंडे यांना पाहतो, त्यांची भाषणं ऐकतो, त्यांची भाषणशैली पाहून असं वाटतं की गोपीनाथ मुंडे भाषण करत आहेत. त्यांनी जी यात्रा हाती घेतली आहे, त्याची नितांत आवश्यकता होती. आपण चांगलं करतो त्याला कर्म म्हणतात आणि या कर्मामुळेच पंकजा मुंडेंचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे म्हणत उदयनराजेंनी पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचं जोरदार स्वागत केलं.
दरम्यान, पंकजा मुंडेंनीही उदयनराजेंसमवतेच फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यासोबतच, आमचे बंधु म्हणत उदयनराजेंच्या भेटीचा उल्लेख केला.