पारधी समाजाने शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : सातपुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:57 PM2020-03-05T19:57:13+5:302020-03-05T20:02:19+5:30
समाजातील ६० टक्के कुटुंबे चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात; पण अंधश्रद्धा त्यांची पाठ सोडत नाही. पारधी समाजातील लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. समाजात सर्वात जास्त कष्ट करणारे, हाल सोसणारा समाज म्हणून पारधी समाजाची ओळख आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले.
सातारा: समाजातील ६० टक्के कुटुंबे चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात; पण अंधश्रद्धा त्यांची पाठ सोडत नाही. पारधी समाजातील लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. समाजात सर्वात जास्त कष्ट करणारे, हाल सोसणारा समाज म्हणून पारधी समाजाची ओळख आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले.
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पारधी समाजाच्या उन्नती मेळाव्याप्रसंगी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या बोलत होत्या. यावेळी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, दलित महासंघाचे अध्यक्ष मधुकर वायदंडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, हरिष पाटणे, अण्णाभाऊ साठे कृती समितीचे उमेश चव्हाण, सोलापूर आदिवासी प्रकल्पचे संचालक अशोक तांबे आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, गावात मिसळल्या शिवाय शिक्षण, सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. स्वत:ची बळ, कमतरता, आत्मभान, चुकीच्या गोष्टी जाणता आल्या पाहिजेत. तरच तुम्ही यशस्वी व्हाल.
राजेश काळे म्हणाले, पारधी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी त्यांना स्थानिक रहिवाशी करणे गरजेचे आहे. त्याच्यात बदल करण्यासाठी शिबिरे, मेळावे घेतले तर त्यांना इतर समाजप्रमाणे जाणीव होईल.
यावेळी मधुकर वायदंडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अशोक तांबे, उमेश चव्हाण, विद्यार्थी निसर्ग पवार, दीपा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शेळी पालनासाठी कर्ज मंजूर झालेल्या कुटुंबाना व घरकुल मंजूर झालेल्या कुटूंबांना अनुदान वाटप करण्यात आले.