पालक मतदानात; मुलं पाळणाघरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:06 AM2019-04-23T00:06:21+5:302019-04-23T00:06:26+5:30
प्रगती जाधव-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या पालकांना मुलांना कुठं ठेवून जायचं? असा प्रश्न पडतो. यावेळी ...
प्रगती जाधव-पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या पालकांना मुलांना कुठं ठेवून जायचं? असा प्रश्न पडतो. यावेळी मात्र पालक मतदान करत असताना त्यांच्या मुलांना मतदान केंद्रात असणाºया पाळणाघरात ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे मानले जाते.
याबाबत अधिक माहिती अशी, निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर देण्याबरोबरच गर्दीला रांगेचे स्वरूप देण्यासाठीही काही स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत महिलांचाही मोठा वाटा असावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाने यंदा काही नवीन उपाययोजना सुचविल्या
आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रांमध्ये पाळणाघराची सोय करण्यात आली आहे. मतदानासाठी सकाळी आणि संध्याकाळी मोठी रांग असते. ही रांग लक्षात घेता महिलांना वेळ लागण्याची शक्यता असते. घरात मुलांकडे बघायला कोणी नाही, असे कारण देऊन कित्येकदा महिला मतदानापासून वंचित
राहतात. हे टाळण्यासाठी पाळणाघराची सोय केली आहे. या पाळणाघराची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. प्रथमोपचाराबरोबरच त्या ही जबाबदारीही सांभाळणार आहेत.
स्वयंसेवक म्हणून कॅडेटची साथ
मतदान केंद्रावर येणाºया मतदारांना मार्ग दाखविण्याबरोबरच त्यांना सहाय्य करण्यासाठी जिल्ह्यातील १५ ते १८ वर्षांतील हजारो एनसीसी कॅडेट साथ देणार आहेत. मतदानासाठी आलेल्या कोणत्याही मतदारावर कार्यकर्त्यांचा प्रभाव आणि दबाव राहू नये आणि निर्धोक वातावरणात मतदान करावं, या उद्देशाने हे विद्यार्थी कर्तव्य बजावणार आहेत.