गावदेवाच्या पायापडणीला नवरी निघाली घोड्यावर-हौस पुरविण्याचा पालकांकडे अट्टाहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:31 PM2018-05-07T23:31:04+5:302018-05-07T23:31:04+5:30
खटाव : लग्न म्हटलं की हौसेला मोजमाप नाही. विशेषत: मुलींची हौस पुरवण्याचा पालकांचा अट्टाहास पाहता लग्न म्हणजे आजही आनंदाचा व उत्साहाचा सोहळाच बनला आहे.
नम्रता भोसले।
खटाव : लग्न म्हटलं की हौसेला मोजमाप नाही. विशेषत: मुलींची हौस पुरवण्याचा पालकांचा अट्टाहास पाहता लग्न म्हणजे आजही आनंदाचा व उत्साहाचा सोहळाच बनला आहे. मुलींचे पालकच आता गावदेवाला मुलगी घोड्यावरून जाईल, या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देत असल्यामुळे या हौसेला आता सीमाच राहिली नाही.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही काही प्रथांना प्राधान्याने महत्त्व दिले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा असो वा नवरी, ही गावदेवाला पाया पडणीसाठी जाण्याच्या पद्धती आहेत. यामध्ये पारंपरिक पद्धतीत बदल होताना दिसून येत आहेत. पूर्वी गावदेव म्हटलं की बँडच्या तालावर चालत वर किंवा वधू निघत असत आणि गावातील प्रत्येक देवाला लग्नाला येण्याचे निमंत्रण देऊन पाया पडून घरी येत असत. या चालत जाण्याच्या पद्धतीमध्ये कालांतराने बदल होत गेला. सुरुवातीला मुलगा गावदेवाला घोड्यावरून जात असे; परंतु यामध्ये अधिकच बदल होऊन सध्या या पद्धतीमध्ये मुलींचीच मागणी घोड्यावरून गावदेवाला जाण्याची वाढल्यामुळे आता सर्रास मुली घोड्यावरून पायापडणीला जाताना दिसून येत आहेत.
या बदलत्या पद्धतीमुळे मात्र घोडेमालकांचेही आता दर वाढू लागले आहेत. तर लग्न तिथी मोजक्याच असल्याने प्रत्येकांनी आधीच घोडे बुक करून ठेवल्याचे पाहावयास मिळत आहे. नडलेल्या लोकांना मात्र याकरिता ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. तर बऱ्याच नवरी व नवºया मुलीला वेळआधीच गावदेवाची मिरवणूक काढावी लागत आहे. पारंपरिक पद्धतीने निघणाºया मिरवणुकांना आजही ग्रामीण भागात महत्त्व असल्याने लग्नाच्या निमित्ताने या पद्धती पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी शहरातून पै-पाहुणे तसेच मित्रमंडळ गावाकडे दाखल होत आहेत. या प्रथेमुळे बँडचालक व घोडे मालकांचा लग्न सराईत बक्कळ व्यवसाय होत आहे.
लग्न सराईमुळे घोड्याला अधिक महत्त्व आले आहे. पायापडणी तसेच वरातीला घोडा लागत असल्यामुळे घोड्याला मागणी वाढत आहे. पायापडणीसाठी मुलींच्या पायापडणीसाठी वेगळा दर आहे. तर मुलांच्या पाया पडणीसाठी वेगळा दर आहे. ज्याप्रमाणे मुलाचे वजन असेल त्याप्रमाणे घोड्याचे दर सांगावे लागत आहेत. कारण ही गावदेव मिरवणूक कमीत कमी चार तास चालत असल्याने वजनदार व्यक्तीमुळे घोड्यालाही त्रास होऊ शकतो.
-सोन्या जाधव, घोडा मालक
ग्रामीण भागात आता गावदेवासाठी मुलापेक्षा मुलींचीच घोड्यावरून जाण्यासाठी मागणी वाढली आहे.