लेकरांच्या सुरक्षेसाठी पालकांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:27+5:302021-05-05T05:04:27+5:30
सातारा : कोविड काळात वर्षाहून अधिक काळ घरात कैद असलेली चिमुकली आता वैतागली आहेत. घराबाहेर, अंगणात किंवा परिसरात ...
सातारा : कोविड काळात वर्षाहून अधिक काळ घरात कैद असलेली चिमुकली आता वैतागली आहेत. घराबाहेर, अंगणात किंवा परिसरात खेळायला जाण्याच्या निमित्ताने काळ त्यांच्यावर लक्ष तर ठेवून नाही, हे पालकांनी सजगपणे बघणे गरजेचे बनले आहे. कोरोनाच्या जाळ्यात अडकलेल्या शासकीय यंत्रणांना धोकादायक पद्धतीने खुल्या असणाऱ्या टाक्या, चेंबर, डीपी यांच्याकडे पाहायला वेळ नाही. मुलांभोवती हे धोके नव्हे तर धोक्याभोवती मुले घोटाळताना पालकांनी त्यांच्यावर नजर ठेवणे अपेक्षित आहे.
कोविड काळामुळे संपूर्ण शासकीय यंत्रणा त्यात व्यस्त झाली आहे. दिवसेंदिवस कडक लॉकडाऊनची शक्यता गृहीत धरून अनेकांनी आपलं गाव गाठलं. लॉकडाऊन असल्याने गल्लीबोळातील रस्ते हे मुलांच्या खेळण्याचे मैदान बनली आहेत. खूप दिवसांनी मिळालेल्या या मोक्याचा फायदा चिमुकली घेत आहेत. अंगणातल्या झाडांवर फळं काढण्यासाठी चढणे, उघड्या टाक्यांशेजारी क्रिकेट खेळणे, आई-बाबांचा डोळा चुकवून पाण्याच्या ठिकाणी जाणे, पाण्यात दगड मारत बसणे असे नाना प्रकारचे खेळ लहान मुले खेळत असतात. अशा वेळी घरात बसून न राहता आई-वडिलांनी आपल्या मुलांना सांगितले पाहिजे की, बाळांनो, जरा जपून... पुढे धोका आहे! तसेच कामानिमित्त काढलेल्या पाण्याच्या टाक्यांवर मजबूत झाकण ठेवणेही गरजेचे आहे.
फळं काढताना तोल गेला तर...
सध्या आंबा, चिंच, पेरू, चिक्कू या फळांचा हंगाम सुरू झाला आहे. आपल्या घराची शोभा वाढावी, घरच्या झाडांची फळे खायला मिळावी, यासाठी अनेक घरांसमोर आंबा, पेरू, चिकूची झाडे लावलेली दिसतात. फळांनी लगडलेल्या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी कंपाउंड घातलेले असते. लहान मुले फळे काढण्यासाठी घरातील लोकांचा डोळा चुकवून कंपाउंडवर चढतात. हाताला फळ लागत नसले तर टाचा उंचावून एक फांदी हाताने वाकवून फळे काढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तोल जाऊन पडण्याची भीती असते.
भुयारी गटारांचे चेंबर उघडेच!
शहरातील सांडपाणी वाहून जावे, यासाठी नगरपालिकेने भुयारी गटारे बांधली आहेत. शहराचा भौगोलिक भाग हा चढ-उताराचा असल्यामुळे भुयारी गटारांची खोली चार ते पाच फूट ठेवण्यात आलेली आहे. ही गटारे साफ करणे, सोयीचे व्हावे, यासाठी ठिकठिकाणी चेंबर काढली आहेत. यामुळे घरातील घाण पाणी बाहेर काढण्याचे काम तर झाले. मात्र, शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटारांची चेंबर्स उघडी असल्याचे पाहावयास मिळते. लहान मुले उत्सुकतेपोटी तिथे जातात आणि आत डोकावून पाहतात. तसेच क्रिकेट खेळताना चेंडू गटारात गेल्यास तो काढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी दुर्घटना घडू शकते. उघडे चेंबर अपघाताला निमंत्रण देत आहेत.
गॅलरीतून डोकावणे धोकादायक
इमारतींमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलं गॅलरीत जाऊन जाळीतून खाली डोकावून पाहत असतात. गॅलरीला लावलेल्या नक्षीदार खांबांमधील अंतर जास्त असेल लहान मुलं बाहेरच्या बाजूला जाऊ शकतात. शहरात असे अपघात घडले आहेत. त्यामुळे दोन खांबांमधील अंतर कमी असेल अशी डिझाईन गॅलरीला करावी. तसेच घरात लहान मूल असेल त्याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
सार्वजनिक शौचालयांच्या टाक्या झाकणाविना
शहरातील अनेक सार्वजनिक शौचालयांच्या टाक्यांना झाकण नाही. या टाक्यांवरील सिमेंटच्या झाकणातील लोखंड चोरण्यासाठी अनेक ठिकाणची झाकणे चोरट्यांनी फोडली आहेत. त्यामुळे अशा उघड्या टाक्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. घराजवळ असणाऱ्या अशा टाक्यांभोवती लहान मुले खेळत असतात. टाक्यांभोवती वाढलेल्या गवत, झुडपांमुळे अंदाज न आल्याने दुर्घटना घडू शकते. चेंडू टाकीत पडला तर मुलं धोका पत्करून तो काढण्याचा प्रयत्न करतात.