सातारा : उंब्रजमध्ये मुलांच्या शाळा इमारतीसाठी पालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:27 PM2018-04-11T13:27:10+5:302018-04-11T13:27:10+5:30
उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुलांची इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने पाडली. यामुळे या शाळेतील विद्यार्थी मुलींच्या शाळेत बसू लागले. एका इमारतीत दोन शिफ्टमध्ये शाळा भरू लागली आणि मुलांच्याबरोबर मुलींचेही शैक्षणिक नुकसान होऊ लागले. त्यामुळे मुलांच्या शाळा इमारतीसाठी बुधवारी सकाळीच पालकांनी आंदोलन सुरू केले आहे.
उंब्रज : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुलांची इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्यावर्षी ग्रामपंचायतीने पाडली. यामुळे या शाळेतील विद्यार्थी मुलींच्या शाळेत बसू लागले. एका इमारतीत दोन शिफ्टमध्ये शाळा भरू लागली आणि मुलांच्याबरोबर मुलींचेही शैक्षणिक नुकसान होऊ लागले. त्यामुळे मुलांच्या शाळा इमारतीसाठी बुधवारी सकाळीच पालकांनी आंदोलन सुरू केले आहे.
येथील मुलांच्या शाळेला इमारत मंजूर करावी म्हणून बुधवारी पालकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. सकाळी नऊ वाजता सुरू झालेले आंदोलन दोन तास सुरू होते.
प्रशासनाच्या वतीने ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका होती. प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी येत नाहीत. तसेच ठोस निर्णय होत नसल्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त होऊ लागले होते.
शाळेच्या मुख्यदरवाज्यासमोर सुरू असलेले आंदोलन शाळेला लागून असलेल्या महामार्गाकडे सरकू लागले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हळूहळू आपला मोर्चा उपमार्गावर वळवून आंदोलन सुरू केले. यावेळी पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला.
पोलिसांनी बळाचा वापर करून प्रमुख आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. परंतु त्यानंतरही हे आंदोलन सर्व पालकांनी हातात घेतले व सर्वजण शाळेच्या पटांगणावर ठिय्या मांडून होते. पालकांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन कोणता निर्णय घेतेय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.