उंब्रज शाळेला पालकांनी ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:46 PM2017-08-24T15:46:42+5:302017-08-24T15:48:34+5:30
उंब्रज : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पटसंख्या कमी झाल्यामुळे शेवटच्या घटका मोजत असताना उंब्रज येथील उत्तम पद्धतीने चाललेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्यामुळे आज पालकांनी गैरहजर मुख्याध्यापकाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
यानंतर अर्ध्यातासाने आलेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी दादागिरीची भाषा केल्याने पालकांशी त्यांची तू तू मै मै झाली.
उंब्रज येथे जिल्हा परिषदेच्या मुलांच्या, मुलींच्या अशा दोन प्राथमिक शाळा आहेत. यातील मुलांची प्राथमिक शाळा मोडकळीस आल्यामुळे ती पाडण्यात आली. व मुलांची, मुलींची प्राथमिक शाळा दोन सत्रात भरू लागली; परंतु गेल्या महिन्यात मुलाच्या प्राथमिक शाळेतील ४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. आणि गेल्या महिनाभरात त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नेमणूक झाली नाही. त्याचा आज भडका झाला.
ही शाळा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे. काही मुले सर्व्हिस रोड वर खेळत असलेली पालकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पालक ग्रामपंचायत सदस्य जयवंत जाधव, सचिन डुबल, अर्जुन जाधव, महेश जाधव, संजय भोसले, मधुकर कुराडे, दत्ता जाधव थेट शाळेत गेले. तेथे अनेक वर्गात शिक्षक नव्हते.
काही वर्गावर चौथीच्या वर्गातील मुले खालच्या वर्गावर शिकवत असलेले निदर्शनास आले. म्हणून मुख्याध्यापकांना ते भेटण्यास गेले. तेव्हा तेथे मुख्याध्यापक अर्जुन पाटील हे नव्हते. त्यामुळे संतप्त पालकांनी मुख्याध्यापकाच्या आॅफिसला कुलूप ठोकले. यानंतर केंद्रप्रमुख आनंदा शिंदे व मुख्याध्यापक अर्जुन पाटील अर्ध्या तासाने शाळेत आले. आल्या आल्या त्यांनी तुम्ही कुलूप का ठोकले.
कुलूप लावण्याचा कोणी अधिकार दिला?, असा पालकांना जाब विचारला. तसेच पालकांना विचारले मुले रस्त्यावर कशी? यावर ते म्हणाले. त्याबाबत लेखी निवेदन तुम्ही दिले आहे का? या उत्तराने अगोदरच संतप्त असलेल्या पालकांच्यात व त्याच्यात जोरदार तू तू मै मै झाले.
यानंतर शिक्षक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर भिसे-पाटील, पै.प्रल्हाद जाधव, संजय पाटील हे आले. त्यांनी ग्रामस्थ, पालक व शिक्षक यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर कुलूप काढण्यात आले. आॅफिसमध्ये परत मिटींग झाली. यात दोन्हीकडून सकारात्मक चर्चा झाली. यातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरले. यानंतर संतप्त झालेले वातावरण निवळले.
या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
- सर्व वर्गावर मुख्याध्यापकांनी शिक्षकांची नियुक्ती करणे.वेळीप्रसंगी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेऊन वर्गनियंत्रण करणे
- शिक्षकांनी शाळेच्या वेळेत, सुटीत जेवण्यासाठी घरी जाऊ नये
- गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे.
- शाळेच्या गेटसमोर लावण्यात येणाºया प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षावर पोलिसांनी कारवाही करावी. म्हणून उंब्रज पोलीस ठाण्याला लेखी पत्र देणे
- दोन्ही शाळेतील शिक्षकांना शाळेत वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक करणे
- सूचना फलक बसवून त्यावर सूचना लिहणे
- परिपाठ आदर्श असावेत.