बालहट्टाने पालक चिंतेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:03+5:302021-05-09T04:40:03+5:30

मोबाइलविषयी मुलांना असलेलं प्रचंड आकर्षण नवीन नाही. पालकांच्या हातात मोबाइल दिसला की, तो मिळविण्यासाठी पूर्वी मुलं हट्ट धरायची. रुसून ...

Parents worried about Balhatta .. | बालहट्टाने पालक चिंतेत..

बालहट्टाने पालक चिंतेत..

Next

मोबाइलविषयी मुलांना असलेलं प्रचंड आकर्षण नवीन नाही. पालकांच्या हातात मोबाइल दिसला की, तो मिळविण्यासाठी पूर्वी मुलं हट्ट धरायची. रुसून बसायची, पण ‘ऑनलाइन’ शिक्षणानं त्यांची ही हौस पुरवली. शिक्षणासाठी मुलांच्या हातात ‘स्मार्ट’ फोन आले. मोबाइलद्वारे मुलांनी अभ्यासाचे धडेही गिरवले. मात्र, अभ्यासापेक्षा मोबाइलचा अनेक वेळा अवांतर वापर होत असल्यामुळे पालकही चिंतेत आहेत. मोबाइल द्यावा, तर मनमानी वापराचं ‘टेन्शन’ आणि नाही द्यावा तर अभ्यासाची चिंता, अशा दुहेरी मनस्थितीत सध्या पालक अडकल्याचे दिसते.

मोबाइलमध्ये असणारी वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स मुलांना भुरळ घालतात. कार्टुन, गेम, छोटे व्हिडीओ पाहताना मुले हरखून जातात. त्यामुळे त्यांना अभ्यासाचं भान राहत नाही. ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांनी मुलांच्या हातात मोबाइल दिलेला असतो, तसेच इंटरनेटचा व्हाउचरही मारलेला असतो. त्यामुळे तो मोबाइल मुलांसाठी एक प्रकारचे खेळणेच ठरतो. तासभर अभ्यास आणि दिवसभर ‘टाइमपास’ असा प्रकार अनेक वेळा मुलांकडून होतो. पालकांनी मोबाइलचा इतर कारणासाठी वापर न करण्याबाबत अनेक वेळा सांगूनही काही मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. पालकांचे दुर्लक्ष होताच, त्यांच्याकडून मोबाइलचा मनमानी वापर सुरू होतो. वास्तविक, मोबाइल जेवढा फायदेशीर तेवढाच धोकादायक असतो. ‘ब्राउजर’वर ऑनलाइन सर्च करताना अनेक विकल्प मुलांसमोर येतात. ते विकल्प योग्य आहेत की नाही, याची कसलीच माहिती मुलांना नसते. मात्र, त्यांच्याकडून वेगवेगळी ‘वेबपेज’ उघडली जातात. त्यामुळे संबंधित ‘साइट’वर असणाऱ्या ‘कंटेन्ट’मुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. पालकांना त्याबाबतची संपूर्ण माहिती असल्यामुळे मुलांच्या हातात मोबाइल देण्यास पालक सहजासहजी तयार होत नाहीत. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांना आपल्या मुलाच्या हातात मोबाइल देणे गरजेचे बनले आहे.

सध्या काही मुलांना मोबाइलची एवढी सवय झाली आहे की, दिवसभर ते त्यामध्ये गुरफटून गेल्याचे पालकांना दिसते. अभ्यासाव्यतिरिक्त मोबाइलचा वापर करू नको, असे पालक वारंवार आपल्या मुलांना सांगतात. मात्र, काही मुले वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशनच्या आकर्षणामुळे मनमानीपणे मोबाइलचा वापर करतात आणि ही बाब पालकांसाठी चिंतेची आहे.

- संजय पाटील

फोटो : ०८केआरडी०१, ०२

Web Title: Parents worried about Balhatta ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.