पारगावचा उड्डाणपूल अडकलाय लालफितीत..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:45+5:302021-02-16T04:39:45+5:30
खंडाळा : आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील पारगावजवळील महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या गावकऱ्यांना महामार्गावरूनच जावे लागते. त्यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत ...
खंडाळा : आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील पारगावजवळील महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या गावकऱ्यांना महामार्गावरूनच जावे लागते. त्यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. वास्तविक, या ठिकाणी मोठा उड्डाणपूल होण्यासाठी प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असला तरी यावर अद्याप मार्ग निघाला नसल्याने पारगावच्या उड्डाणपुलाचा प्रश्न लालफितीत अडकला आहे. त्यामुळे प्राधिकरणाने खंबाटकी बोगद्द्याचे काम सुरू केले असले तरी पारगाव उड्डाणपुलाला मुहूर्त कधी सापडणार? असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जातोय.
खंडाळा-पारगाव येथे महामार्गावर असणारा सध्याचा उड्डाणपूल हा अतिशय छोटा आहे. त्याखालून मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत. खंडाळा अहिरे रस्त्यावर असणाऱ्या अनेक कंपन्यांची मोठी वाहने तसेच म्हावशी येथील साखर कारखान्यांचे उसाच्या ट्रकची वाहतूक करण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो; मात्र ही वाहने पुलाखालून जाणे अवघड आहे. यासाठी महामार्गावर इतर गावांतून असलेल्या मोठ्या पुलासारखा हाही पूल व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी ठराव करून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत धाव घेतली होती. मात्र, यावर अद्यापर्यंत ठोस पर्याय निघाला नाही. त्यामुळे उड्डाणपुलाबाबत प्रशासनाची नक्की भूमिका काय? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
पारगाव, खंडाळा येथील ग्रामस्थ, शेतकरी, महिला यांना शेतात जाण्यासाठी महामार्गावरूनच ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावरील भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे महामार्ग ओलांडणे धोकादायक बनत आहे. यामध्ये आजपर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे महामार्गालगत दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यांचे रुंदीकरण करणे, एलईडी दिवे बसविण्यात यावेत, पारगाव कमान ते भैरवनाथ मंदिरपर्यंत दोन्ही बाजूने गटार काढणे, एसटी बसस्थानकासमोरील बोगद्यात लोखंडी अथवा स्ट्रिट खांब बसविण्यात यावेत, बसस्थानक ते राजावत हॉटेलपर्यंत असणाऱ्या रस्त्याच्या कडेला दुतर्फा लाइटची सोय करण्यात यावी, याबाबत तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
(चौकट..)
असून अडचण नसून खोळंबा ....
खंडाळा बसस्थानकासमोर महामार्गावर असणारा पूल हा कमी उंचीचा असल्याने मोठी वाहने, कंटेनर त्याखालून जात नाहीत. शिवाय या जागी पश्चिमेकडील सेवा रस्ता अरुंद असल्याने साधी एसटी सुद्धा वळवता येत नाही. त्यामुळे मोठ्या वाहनांची कोंडी होते. त्यामुळे हा पूल असून, अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था आहे.
(कोट)
खंडाळा पारगाव येथे मोठा उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. याबाबत हायवे प्रशासनाशी अनेकदा चर्चा झाल्या आहेत; मात्र प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे आहे. आता जुन्या टोल नाक्याजवळ मोठा उड्डाणपूल होणार, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हायवे प्रशासनाने त्यांचे मत विचारात घ्यावे. तसेच मोठा उड्डाणपूल बसस्थानकाच्या जागी होऊन जुन्या टोल नाक्यापर्यंत सेवारस्ते तयार करावेत.
-युवराज ढमाळ, ग्रामस्थ, पारगाव
.... . ..............................................