शंभर वर्षांपासून वाकळवाडीत पीरसाहेबांचा उरूस साजरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:48 PM2019-05-19T19:48:51+5:302019-05-19T19:48:55+5:30
रशिद शेख । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सध्या सगळीकडे यात्रा, जत्रा, उरुस धामधुमीत चालू आहेत. पै-पाहुणे, मित्र-मंडळी यात्रा, ...
रशिद शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सध्या सगळीकडे यात्रा, जत्रा, उरुस धामधुमीत चालू आहेत. पै-पाहुणे, मित्र-मंडळी यात्रा, उरुसच्या निमित्ताने एकत्र येत असतात. यापैकी बहुधा ‘उरुस’ हा शब्द कानावर पडला की डोळ्यासमोर येते ते मुस्लीम समाजातील कोणत्याही पीरसाहेबांचा उत्सव व तो साजरा करण्यासाठी मुस्लीम समाजातील ग्रामस्थ व त्यांच्या जोडीला सर्वधर्मीय बांधव एकत्र येतात.
खटाव तालुक्यातील वाकळवाडी गावात एकही मुस्लीम समाजाचे घर नसताना गेली कित्येक दशके येथे पीरसाहेबांचा उरूस मोठ्या उत्साहाने ग्रामस्थ साजरा करताना दिसत आहेत. राज्यातील एक विविधतेतून एकता जपणाऱ्या या गावाचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविणारे हे वाकळवाडी गाव आहे.
वाकळवाडी हे १३०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गाव. पीरसाहेबांचा उरुस मोठ्या उत्साहात गेली शंभर वर्षांपासून अधिक काळ येथे साजरा केला जातो.
प्रत्येकवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामस्थ पीरसाहेबांचा उरूस भरविण्याची मीटिंग आयोजित करतात. त्यामध्ये उरुसाचे आणखी मोठ्या प्रमाणावर कसा साजरा करता येईल, यासाठी प्रयत्न केले जातात. सुरुवातीला पीरसाहेबांच्या दर्ग्याला चुना दिला जातो. त्यानंतर शेजारील गावातील मुस्लीम पुजारी आणून विधिवतपणे ग्रामस्थ गिलाफ, फूलचादर चढावा करतात, पहाटे मानकरी नैवेद्य दाखवून गावातून पीरसाहेबांचा उंच असा झेंडा संपूर्ण गावातून पारंपरिक वाद्यवृंदाच्या गजरात काढला जातो. यासर्व गोष्टी वाकळवाडीतील हिंदू बांधव करतात. बाहेरगावीचेतसेच माहेरवाशीण या पीरसाहेबांच्या उरसाला न चुकता आवर्जून हजेरी लावतात.
ग्रामस्थांकडून परंपरा आजही कायम..
वाकळवाडी गावाच्या निर्मितीपासून त्यावेळच्या पूर्वजांनी पीरसाहेबांची स्थापना मोठ्या श्रद्धेने गावात केल्याची माहिती ग्रामस्थ सांगत आहेत. विशेष म्हणजे, एकही मुस्लीम समाजातील घर किंवा एकही मुस्लीम व्यक्ती गावात वास्तव्यास नसताना पीरसाहेबांचा उरूस साजरा करण्याची परंपरा ग्रामस्थांनी सुरू ठेवली आहे.