महामार्गाच्या नाल्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; वनवासमाचीतील घटना
By संजय पाटील | Published: September 29, 2023 12:46 PM2023-09-29T12:46:30+5:302023-09-29T12:46:53+5:30
पुरूष जातीचा मृतदेह असून नेमके काय घडले असावे? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाकडेला वनवासमाची, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. महामार्गालगत असलेल्या नाल्यात मृतदेह पडलेला असल्याने घातपात झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुरूष जातीचा मृतदेह असून नेमके काय घडले असावे? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची परिसरात महामार्ग व सेवारस्त्यामधे असलेल्या नाल्यात शुक्रवारी मृतदेह पडलेला होता. पुरूष जातीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तो जाळण्याचा प्रयत्न झाला असावा. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडल्याचे पहाटे व्यायामासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. हा प्रकार समजताच तळबीडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल वरूटे यांच्यासह पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सुत्रे वेगाने हलवली.
हा घातपात आहे की अन्य काही प्रकार, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी तीन पथके तयार केली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. मृतदेह स्थानिक कोणाचा आहे की बाहेरून आणत फेकून दिला आहे? हा घातपात आहे की अन्य काही? याबाबत पोलीस तपास करत आहेत.