परजिल्ह्यातील मंत्र्यांचा साताऱ्यात उठाव

By admin | Published: January 20, 2017 10:31 PM2017-01-20T22:31:16+5:302017-01-20T22:31:16+5:30

राष्ट्रवादीविरोधात मोर्चेबांधणी : चंद्रकांतदादा, विजयबापू अन् सदाभाऊ यांची पद्धतशीर व्यूहरचना

Parvillah's ministers revolted in Satara | परजिल्ह्यातील मंत्र्यांचा साताऱ्यात उठाव

परजिल्ह्यातील मंत्र्यांचा साताऱ्यात उठाव

Next


सातारा : गेल्या दीड दशकापासून सातारा जिल्ह्यात राजकीय मक्तेदारी निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांविरोधात यंदाच्या झेडपी निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली जात असली तरी याचे सूत्रधार परजिल्ह्यातील नेते आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत या तिघांनी या आठवड्यात जिल्ह्यातील आपापल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना ‘चार्जिंग’ करून राष्ट्रवादीच्या विरोधात महाआघाडीला पूरक असे वातावरण बनविले आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात दूध, सोसायटीपासून जिल्हा बँकेपर्यंत आणि ग्रामपंचायतीपासून झेडपीपर्यंत राष्ट्रवादीचीच निर्विवाद सत्ता राहिल्याने साताऱ्यात ‘आमचेच सरकार’ अशी जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांची भावना आहे. विशेष म्हणजे या मक्तेदारीला मोडून काढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, वाईचे माजी आमदार मदन भोसले, फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, कोरेगावचे अ‍ॅड. विजयराव कणसे ही मंडळी आपल्या परीने राष्ट्रवादीचे ‘तख्त’ हलविण्यासाठी इर्ष्येने प्रयत्न करत असतात. मागील सर्वच निवडणुकांचा इतिहास पाहता राष्ट्रवादीचा प्रबळ विरोधक हा काँगे्रसच राहिला आहे. केंद्र व राज्यातील सत्ता हरवून बसलेली काँगे्रस काहीशी बॅकफूटवर जाऊन पडली आहे. विधान परिषदेच्या सातारा-सांगली विधान परिषद मतदार संघातील विजयाने काँगे्रसला आलेले तेज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत टिकून राहील, ही शक्यता अंधूक बनली आहे.
या राजकीय वातावरणाचा फायदा उठवत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या तीन पक्षांनी आक्रमक पावले उचलत निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या चाचपणीचा धडाका सुरू केलेला पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ काँगे्रसचे जिल्ह्यातील मातब्बर नेतेमंडळी तोडीस तोड कार्यक्रम घेतील, असे वाटत असतानाच भाजप, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँगे्रसची जागा पटकावली आहे.
भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री असताना जास्त काळ सातारा जिल्ह्यातच घालवत आहेत. जिल्हाभर मेळावे व बैठका घेऊन त्यांनी भाजपचे वातावरण निर्माण केले. खासदार उदयनराजे भोसले यांचे पक्षात स्वागतच करू, असे खुले आमंत्रण त्यांनी उदयनराजेंना दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे साताऱ्याच्या सहपालकमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी तर थेट फलटणमध्ये मेळावा घेऊन राष्ट्रवादीचे नेते विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या ‘होमपिच’वरच फोर सिक्सर मारायला सुरुवात केली. जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनीही ‘अज्ञातवास’ सोडून साताऱ्यात जास्त लक्ष घातले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या त्यांनी स्वत: मुलाखती घेतल्या. तसेच ‘राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत मुके राहतात, जिल्ह्यातील प्रश्नांवर आम्ही सरकारात असतानाही भाजपच्या निर्णयांविरोधात भांडतो, अशी टीका शिवतारे यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर केली.
महायुतीतल्या मंत्र्यांची फौज साताऱ्यात येऊन राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्यासाठी तयारीला लागली आहे. जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अद्याप महसूल मंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही.
मात्र, राष्ट्रवादी स्थानिक नेत्यांच्या मागे ‘काळजीचा भुंगा’ लावून दिला
आहे. (प्रतिनिधी)
सुभाष देशमुखांचीही खेळी...
युतीचे पालकमंत्री सातारा जिल्ह्यातील आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देत असतानाच दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही नवी खेळी केली. खंडाळा येथे साखर कारखान्याच्यो सोहळ्यात ‘राज्याच्या सहकारात मदन भोसले यांची गरज आहे,’ असे सांगून वाई मतदारसंघातील कॉँग्रेस नेत्याला जणू भाजपचे आवतणच दिले आहे.

Web Title: Parvillah's ministers revolted in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.