पुसेगाव यात्रा : श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५६ लाख अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 03:56 PM2019-01-05T15:56:01+5:302019-01-05T16:00:30+5:30
पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी रथावर तब्बल ५६ लाख १३ हजार ६४ रुपयांची देणगी अर्पण केली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशांतील चलनांचा समावेश आहे. या रकमेत तुलनेने दहा रुपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. यात्रा संक्रांतीपर्यंत सुरूच राहणार असल्याने देणगीच्या रकमेत वाढ होणार आहे.
पुसेगाव : येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी रथावर तब्बल ५६ लाख १३ हजार ६४ रुपयांची देणगी अर्पण केली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशांतील चलनांचा समावेश आहे. या रकमेत तुलनेने दहा रुपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. यात्रा संक्रांतीपर्यंत सुरूच राहणार असल्याने देणगीच्या रकमेत वाढ होणार आहे.
पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त दाखल होणाऱ्या भक्तांच्या संख्येत वर्षांनुवर्षे लाखोंने वाढ होत आहे. यंदा लाखो भाविकांनी हजेरी लावून श्रीं रथावर मनोभावे १०, २०, ५०, १०० तसेच नव्या ५०० तसेच २,००० रुपयांच्या नोटांच्या माळा अर्पण केल्या.
रथोत्सवादिवशी पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोटांच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी अकरापासून गर्दीत वाढ होऊन बघता-बघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला. भाविकांनी आपापल्या परीने नोटांच्या माळा करून रथावर अर्पण केल्या.
श्री सेवागिरी महाराजांचा रथ रात्री दहा वाजता मंदिरात पोहोचला. त्यानंतर रथावरून नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात ही रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली.
रात्री अकरा वाजता देणगीची रक्कम मोजण्यास प्रत्यक्ष प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये रथावर ५६ लाख १३ हजार ६४ रुपयांची देणगी अर्पण झाल्याचे स्पष्ट झाले.
सातासमुद्रापारही लौकिक
श्री सेवागिरी महाराजांचा लौकिक सातासमुद्रापार पसरत आहे. यावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रकमेत भारतीय चलनाबरोबरच इतर देशांतील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये परकीय चलनांचा समावेश आहे.