पसरणी घाट बुधवारी वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:36+5:302021-06-29T04:26:36+5:30
वाई पसरणी घाटातील संरक्षण कठ्यांच्या दुरुस्तीसाठी घाट बुधवारी पूर्णपणे बंद राहणार असून येथील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. ...
वाई
पसरणी घाटातील संरक्षण कठ्यांच्या दुरुस्तीसाठी घाट बुधवारी पूर्णपणे बंद राहणार असून येथील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. वाईहून –पाचगणी-महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक संपूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. तशी परवानगी उपविभागीय कार्यालयाकडून घेण्यात आल्याचे बांधकाम विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्याने पावसात वाहनाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी बांधकाम विभागाकडून हा तातडीने निर्णय घेण्यात आलेला आहे. वाई-पाचगणी-महाबळेश्वर परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असते. घाटात पुलाचे काम चालू असून मोरीच्या कामात खडक लागल्याने ब्लास्टिंग करून काढावे लागत असल्याने रस्ता एक दिवस बंद ठेवावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घाटात दुरुस्तीची कामे करताना वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो. दुरुस्तीचे काम करताना अनेक अडचणी येऊ शकतात, म्हणूनच संपूर्ण घाट एक दिवसासाठी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, पोलादपूर-महाबळेश्वर-वाईकडे येणारा रस्ता (पसरणी घाटमार्गे) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पसरणी घाटातील मोरी व संरक्षक भिंती अतिवृष्टीमुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला असल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तरी हा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यासाठी मोरीचे बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी ३० जून रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच्या कालावधीसाठी एक दिवसाकरिता रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. तरी या कालावधीमध्ये वाई पसरणी घाटामार्गे पाचगणी, महाबळेश्वरकडे होणारी अवजड वाहतूक वाई - सुरुर - पाचवड - सातारा - मेढा - महाबळेश्वर, तर लहान वाहनांसाठी वाई - सुरुर - पाचवड - मेढा - महाबळेश्वर तसेच सुरुर - वाई उडतारे - कुडाळ - पाचगणी - महाबळेश्वर अशी वळवण्यात येणार आहे.