सातारकरांच्या सेवेत आजपासून पॅसेंजर; मात्र तिकीट एक्सप्रेसचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 12:16 PM2021-11-16T12:16:56+5:302021-11-16T12:20:02+5:30
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये सर्वप्रथम सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांपासून संप सुरू केला आहे. त्यातच दिवाळीमुळे एक्स्प्रेसचे दोन आठवड्यांचे आरक्षण पूर्ण झाले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. हाच विचार करून रेल्वे प्रशासनाने मंगळवारपासून सातारा-कोल्हापूर, पुणे-सातारा पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सातारकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये सर्वप्रथम सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यातून रेल्वे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावते. तर पॅसेंजरचे दर कमी असल्याने मोठी गर्दी असते. तेथे पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे कोरोना रोखणे अवघड असल्याने पॅसेंजर बंद केल्या होत्या. तब्बल वीस महिन्यांनंतर पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मंगळवार, १६ पासून सातारा-पुणे, सातारा-कोल्हापूर गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना पॅसेंजर म्हटले जाणार असले तरी तिकीट मात्र एक्स्प्रेसचे आकारले जाणार आहे. तसेच थांबाही पॅसेंजरप्रमाणे नसून केवळ जेथे एक्स्प्रेस थांबत होती. तेथेच त्या थांबणार आहेत. नव्याने सुरू होणार असलेल्या पॅसेंजरमधून ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच प्रवास करता येणार आहे.